आजच्या धावपळीत आरोग्य टिकवणं ही एक महाकठीण जबाबदारी झाली आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम, योगासोबत ‘चालणे’ हे एक सोप्पं आणि नैसर्गिक माध्यम आहे. मात्र केवळ चालणं पुरेसं नाही, तर ते ‘योग्य वेळी’ केलं गेलं पाहिजे, तेव्हाच त्याचा खरा फायदा मिळतो. बर्याच लोकांच्या मनात सतत हा प्रश्न असतो चालायला सकाळी जावं की संध्याकाळी?

सकाळी चालण्याचे फायदे
सकाळी चालण्याचे फायदे सांगताना एक गोष्ट स्पष्ट होते. तेव्हा वातावरण सर्वात स्वच्छ असतं, म्हणजेच शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. यामुळे फुफ्फुसं मजबूत राहतात आणि दिवसाची सुरुवात उर्जेने होते. याशिवाय सकाळी सुर्यप्रकाशातून मिळणारं व्हिटॅमिन-D तुमची हाडं मजबूत करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. मानसिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मॉर्निंग वॉकमुळे ताण कमी होतो, मन शांत राहतं आणि कामात लक्ष केंद्रित होण्याची शक्ती वाढते.
संध्याकाळी चालण्याचे फायदे
पण संध्याकाळी चालणं देखील काही कमी नाही. दिवसभराचा ताण, मानसिक थकवा आणि शरीरात साचलेली ऊर्जा याचा तो खूप चांगल्या प्रकारे निचरा करतो. संध्याकाळी चालल्यामुळे झोप अधिक गाढ लागते, आणि जेवणानंतर हलकं चालणं केल्यास पचनसंस्थाही सुधारते. विशेषतः गॅस, आम्लता यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ही सवय अत्यंत उपयुक्त ठरते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सकाळी चालणं आणि संध्याकाळी चालणं या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही, तर दोन्ही वेळा वेगळ्या गरजांसाठी उपयोगी आहेत. जर तुमचं लक्ष्य वजन कमी करणं आणि चयापचय वाढवणं असेल, तर सकाळी चालणं अधिक फायदेशीर ठरेल. पण जर तुम्ही मानसिक शांतता शोधत असाल, ताण घालवायचा असेल, तर संध्याकाळची वेळ योग्य आहे.
योग्य काय?
शेवटी, चालण्याची वेळ ही तुमच्या जीवनशैलीनुसार आणि आरोग्याच्या गरजेनुसार ठरवावी. मुख्य म्हणजे चालणं ही सवय चिकाटीने आणि रोजची असावी, मग ती सकाळी असो की संध्याकाळी.