तुम्ही जर कधी ट्रेनचं तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तुमचाही असा अनुभव असेल की बुकिंग सुरू झाल्यावर काही क्षणांतच सगळी तिकिटं संपतात. तांत्रिकतेमध्ये पारंगत एजंट्स आणि थर्ड पार्टी सॉफ्टवेअर यामुळे अनेक सामान्य प्रवाशांना तिकीट मिळणं अवघडच व्हायचं. पण आता, भारतीय रेल्वेने या गोंधळावर एक मोठा निर्णय घेतला आहे.

15 जुलैपासून नवीन नियम लागू
15 जुलै 2025 पासून आयआरसीटीसीने तात्काळ तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांत कोणताही एजंट, तृतीय पक्ष सेवा किंवा सॉफ्टवेअरद्वारे बुकिंग करता येणार नाही. या काळात फक्त सामान्य प्रवाशांनाच तिकीट बुक करता येणार आहे.आणि ही बाब खरंच प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.
एसी डब्ब्यांसाठी तात्काळ बुकिंग सकाळी 10:00 वाजता सुरू होते, तर नॉन-एसीसाठी 11:00 वाजता. नव्या नियमानुसार, 10:00 ते 10:30 आणि 11:00 ते 11:30 या वेळेत केवळ सामान्य प्रवाशांनाच तिकीट बुक करण्याचा अधिकार असेल. यामुळे आधी काही सेकंदांत गायब होणाऱ्या तिकिटांवर नियंत्रण मिळवणं शक्य होईल, आणि गरजूंना प्रवासाची संधी मिळेल.
रेल्वेने या निर्णयामागे कारण दिलं आहे, काळाबाजार रोखणं. आधी असं अनेकदा घडत होतं की एजंट आणि सॉफ्टवेअर वापरणारे गट काही सेकंदांत सगळी तिकिटं उचलून घेत असत. नंतर ती तिकिटं ते वाढीव किमतीत विकत असत. यातून सामान्य माणसाला ना तिकीट मिळायचं, ना न्याय. या सगळ्या पार्श्वभूमीवर रेल्वेचं हे पाऊल सामान्य प्रवाशांना दिलासा देणारे ठरत आहे.
आधार ओटीपी पडताळणी
इतकंच नाही, तर अजून एक मोठा बदल म्हणजे आधार ओटीपी पडताळणी. आता तात्काळ तिकीट बुक करताना आयआरसीटीसी खातं आधारशी लिंक असणं आवश्यक आहे, आणि बुकिंगच्या वेळी आलेला ओटीपी मोबाईलवर पडताळला गेल्याशिवाय तिकीट कन्फर्म होणार नाही. त्यामुळे कोणत्याही बनावट आयड्यांद्वारे बुकिंग करणं जवळजवळ अशक्य होईल.
रेल्वेने प्रवाशांना सुचवलं आहे की त्यांनी आपलं आयआरसीटीसी प्रोफाइल लवकरात लवकर आधारशी लिंक करावं, आणि त्यांचा मोबाईल नंबरही आधारमध्ये अपडेट असावा. हे केल्याने बुकिंगदरम्यान तांत्रिक अडथळे येणार नाहीत आणि प्रवासाची योजना अखेरच्या क्षणी कोलमडणार नाही.