श्रावण महिना सुरू झाला की, वातावरणात एक वेगळीच भक्तीभावाची लहर पसरते. प्रत्येक शिवमंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष घुमतो, शिवलिंगावर पाणी वाहिलं जातं, बेलपत्र अर्पण केलं जातं आणि भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी अखंड अभिषेक सुरू होतो. हा महिना केवळ पूजा-अर्चनेचा काळ नसतो, तर भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा एक अनमोल अध्याय असतो. आणि विशेष म्हणजे ही भावना केवळ भारतापुरती सीमित नसते. जगभरात अनेक ठिकाणी, विविध देशांमध्येही श्रावणचा उत्सव तितक्याच श्रद्धेने साजरा होतो, जिथे दूरदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आपली संस्कृती आणि श्रद्धा अजूनही जपली आहे.
कधीपासून सुरू होणार श्रावण?
या वर्षी श्रावण महिना 11 जुलैपासून सुरू होत असून तो 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. हिंदू पंचांगानुसार, हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो आणि त्याच्या प्रत्येक सोमवारी विशेष महत्त्व असतं. अनेक भाविक या काळात उपवास करतात, कावड यात्रा काढतात आणि शिवमंदिरात जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेतात. भारतात वाराणसी, उज्जैन, अमरनाथसारखी स्थळं हजारो लाखो भक्तांनी गजबजतात, पण त्याच वेळी भारताबाहेरही अनेक स्थळी हीच भक्तिभावाची लाट पाहायला मिळते.

पशुपतिनाथ मंदिर
नेपाळमध्ये काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिर हे त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण आहे. हे प्राचीन मंदिर केवळ नेपाळचं नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं. श्रावणच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. असं मानलं जातं की इथे एकदा दर्शन घेतल्यावर पुनर्जन्माचा दुष्चक्र संपतो.
अर्धनारीश्वर मूर्ती (द.आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गमध्ये स्थापन करण्यात आलेली 90 टन वजनाची अर्धनारीश्वर मूर्तीदेखील श्रद्धेचं एक विलक्षण उदाहरण आहे. ही मूर्ती केवळ शिल्पकलेचा नमुना नाही, तर संस्कृती टिकवण्याचा एक प्रयत्न आहे, जो जगाच्या दुसऱ्या टोकाला झाला आहे.
प्रम्बानन मंदिर
इंडोनेशियाच्या जावा बेटावर वसलेलं प्रम्बानन मंदिर हे आठव्या शतकात उभारलेलं एक भव्य शिवमंदिर आहे, जे आज युनेस्कोच्या जागतिक वारशाचा भाग आहे. या मंदिरातही श्रावणच्या काळात विशेष पूजा होते आणि इथली भव्यता पाहून आपल्याला भारावून जायला होतं.
अरुलमिगु श्रीराजा कालियम्मन मंदिर
मलेशियातील जोहोर बारूमधील अरुलमिगु श्रीराजा कालियम्मन मंदिर हे आपल्या अनोख्या काचांच्या भिंतींसाठी प्रसिद्ध आहे. 1922 मध्ये बांधलेलं हे मंदिर आजही लाखो भक्तांना आकर्षित करतं, विशेषतः त्यात जडवलेले 3 लाख रुद्राक्ष त्याला एक आगळंवेगळं तेज देतात.
मुन्नेश्वरम मंदिर
श्रीलंकेतील मुन्नेश्वरम मंदिर रामायणाशी संबंधित आहे. असं मानलं जातं की रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामाने इथे येऊन शिवाची पूजा केली होती, ज्यामुळे हे ठिकाण धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानलं जातं.
मुक्ति गुप्तेश्वर मंदिर
ऑस्ट्रेलियामध्येही श्रद्धेचा दीप तेवतो. न्यू साउथ वेल्समधील मुक्ति गुप्तेश्वर मंदिर हे परदेशातील पहिलं गुप्तेश्वर ज्योतिर्लिंग मानलं जातं. या मंदिराच्या स्थापनेने दक्षिण गोलार्धातही शिवभक्तीचं एक भक्कम केंद्र तयार केलं आहे.
कटासराज मंदिर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कटासराज मंदिर हे इतिहास आणि श्रद्धेचा अनोखा संगम आहे. शिव महापुराणाशी निगडित असलेलं हे मंदिर आजही तिथल्या हिंदूंसाठी एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे.