आरोग्याच्या बाबतीत कधी कोणते संकट येईल माहित नसते. आज सकाळी तुम्ही तंदुरुस्त असता, पण संध्याकाळपर्यंत एखादी शस्त्रक्रिया आवश्यक होऊ शकते. अशा कठीण प्रसंगी, आरोग्य विमा म्हणजे एखाद्या संकटात दिलासा देणारा हात. मात्र, आतापर्यंतचा अनुभव असा होता की रुग्णालयात किमान 24 तास भरती केल्याशिवाय विमा दावा मंजूर होत नसे. पण आता हे चित्र बदलत आहे.

नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाने उपचारांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. जी शस्त्रक्रिया कधी काळी 3 दिवस रुग्णालयात राहिल्याशिवाय पूर्णच होत नव्हती, ती आज 2-3 तासांत पार पडते. मोतीबिंदू, अपेंडिक्स किंवा किडनी स्टोनसारख्या शस्त्रक्रियांसाठी आता रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज उरलेली नाही. रोबोटिक सर्जरीमुळे हे आणखी सहज आणि वेगाने होऊ लागले आहे. अशा वेगवान प्रक्रियांना अनुसरून काही विमा कंपन्यांनी आता 24 तासांचा नियमच शिथिल केला आहे.
‘या’ कंपन्यांनी बदलले नियम
ICICI Lombard, Care Health Insurance आणि Niva Bupa या तीन कंपन्यांनी अशी पॉलिसी आणली आहे ज्या अंतर्गत फक्त 2 तास हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावरही विमा दावा करता येतो. ICICI Lombard Elevate प्लॅन 10 लाख रुपयांचं कव्हर 9,195 रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये देतो, तर Care Supreme यासाठी 12,790 रुपये आणि Niva Bupa 14,199 रुपये आकारतो. या सगळ्या पॉलिसी 30 वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी आदर्श मानल्या जातात, पण वयानुसार विविध पर्याय उपलब्ध असतात.
भारतामध्ये वैद्यकीय महागाईचा दर जवळपास 17% पर्यंत पोहोचला आहे. हा दर इतर सर्वसाधारण महागाईच्या दरापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळेच योग्य आणि किफायतशीर आरोग्य विमा असणं ही आजच्या काळात गरज बनली आहे. पण केवळ प्रीमियम कमी आहे म्हणून पॉलिसी घ्यायची नाही; तिच्या कव्हरेजची संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. रुग्णवाहिकेचा खर्च, तपासण्या, डे-केअर ट्रीटमेंटसारख्या बाबी त्यात समाविष्ट आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
विमा घेताना काय काळजी घ्याल?
पूर्व-अस्तित्वात असलेल्या आजारांसाठीही विमा मिळतो, पण बहुतेक पॉलिसीत 36 ते 48 महिन्यांची प्रतीक्षा कालावधी असतो. या आजारांची माहिती पॉलिसी घेतानाच देणं गरजेचं आहे, अन्यथा क्लेम प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्याचप्रमाणे, को-पे (कॉस्ट शेअरिंग) जरी प्रीमियम कमी करतं, तरी अडचणीच्या वेळी ते तुमच्यावर आर्थिक बोजा वाढवू शकतं. त्यामुळे त्याचा विचार काळजीपूर्वक करा.
आजकाल अनेक विमा कंपन्या कॅशलेस सुविधा देतात, पण ती सुविधा फक्त त्यांच्या ‘नेटवर्क हॉस्पिटल’मध्येच लागू असते. त्यामुळे पॉलिसी घेताना या हॉस्पिटल्सची यादी तपासणं आवश्यक आहे. अन्यथा, तुम्हाला बिल आधी भरावं लागेल आणि नंतर विमा कंपनीकडून भरपाई मिळेल.