आपण रोजच्या जेवणात कांदा वापरतो, पण कधी विचार केला आहे का की आपण खातोय तो कांदा नेमका कोणता आहे आणि त्याच्या इतर प्रकारांचे आपल्या शरीरावर वेगळे परिणाम होतात का? विशेषतः जेव्हा विषय येतो वसंत ऋतूतील कांद्याचा, ज्याला आपण हिरवा कांदा किंवा कांद्याची पात म्हणून ओळखतो. हा कांदा दिसायला वेगळा असला तरी त्याचा स्वाद, पोषणमूल्यं आणि आरोग्यावर होणारे परिणाम सामान्य कांद्यापेक्षा खूप वेगळे असतात.

वसंत ऋतूमधील कांदा
हिरवा कांदा म्हणजे काय? तर तो एक तरुण कांदा असतो, जो अजून मोठा आणि पूर्ण वाढ झालेला नसतो. त्याचा पांढरा कंद लहानसा असतो आणि हिरवी पाने लांब व टवटवीत असतात. यामध्ये सौम्य गोडसर चव असते, जी अगदी ताजी आणि हलकी जाणवते. तो सामान्य कांद्यासारखा तिखट लागत नाही. म्हणूनच तो सूप, नूडल्स, सॅलड, आणि चायनीज प्रकारात बऱ्याच वेळा सजावटीसाठी वापरला जातो. जेवणाला रंग, ताजेपणा आणि सौम्य चव देणारा हा कांदा खास वसंत ऋतूमध्ये अधिक सहजपणे उपलब्ध होतो.
दुसरीकडे, आपल्या घरात दररोज वापरला जाणारा सामान्य कांदा मोठा, जाडसर व पूर्ण वाढलेला कांदा असतो. त्याची चव तीव्र असते, डोळ्यांत पाणी आणणारी, पण भारतीय स्वयंपाकात त्याशिवाय जेवणाची कल्पनाच करवत नाही. भाजी, रस्सा, भाकरीसोबतचा ठेचा, सगळीकडे त्याचे स्थान ठाम आहे.
कांद्याची पात व साध्या कांद्याचे फायदे
आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर हिरव्या कांद्यात जीवनसत्त्व A आणि K चांगल्या प्रमाणात असतात. विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचे गुण त्यामध्ये असतात. तो त्वचेसाठी, पचनासाठी, आणि हाडांसाठी फायदेशीर असतो. दुसरीकडे, सामान्य कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अॅलिल सल्फाइड्स, आणि अनेक प्रकारचे फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि कॅन्सरविरोधात मदत करतात.
त्यामुळे पाहायला गेलं तर आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही कांदे फायद्याचेच ठरतात. त्यामुळे दोघांमध्ये तुलना न करता, आपण आपल्या जेवणात दोघांनाही स्थान दिलं पाहिजे. एक तुम्हाला ताजेपणा देतो, तर दुसरा तुमचं जेवण अधिक चविष्ट बनवतो. आहारात दोघांचाही समावेश केला तर आपल्या आरोग्याला विविध फायद्यांचा लाभ होतो.