पाकिस्तान तर फक्त बाहुला, भारतासाठी खरा शत्रू ठरतोय शेजारी देश; ‘या’ प्रमुख पातळ्यांवर भारताला वाढला धोका!

Published on -

भारत आणि पाकिस्तान संघर्ष काही नवा नाही, मात्र अलीकडेच भारतासाठी एक शेजारी देश जास्त धोकादायक ठरत असल्याचे चित्र दिसून येतेय. काही दिवसांपूर्वीच भारताचे उप-लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी एका महत्त्वाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे या संघर्षाची नवी बाजू समोर आली. त्यांनी म्हटलं की पाकिस्तानला जरी आपण वर्षानुवर्षे शत्रू मानत आलो असलो, तरी खरं आव्हान चीनकडून येतंय, तेही अनेक स्तरांवर, अनेक पातळ्यांवर.

ऑपरेशन सिंदूरसारख्या लष्करी मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला होता. पण त्यावेळी मैदानात केवळ पाकिस्तान नव्हता, तर मागे उभा होता एक मोठा खेळाडू चीन. सिंह यांच्या मते, पाकिस्तानच्या लष्करातील सुमारे 81% उपकरणं ही चिनी बनावटीची होती, आणि त्याला मिळणारी गुप्त माहितीही चीनमार्फतच येत होती. या जोडीला तुर्कीचंही सामरिक सहकार्य मिळालं होतं. जर चीनचा हा सगळा आधार नसेल, तर पाकिस्तान चार दिवससुद्धा युद्धात टिकू शकला नसता, असं सिंह ठामपणे म्हणाले.

चिनी वस्तूंना बंदी

हे विधान केवळ एक लष्करी निरीक्षण नव्हतं, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर इशारा
होता. त्यामुळेच भारत सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय लष्करात चिनी बनावटीचे कोणतेही सुटे भाग, विशेषतः ड्रोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांमध्ये वापरले जाणार नाहीत. हा निर्णय ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनाशी जुळणारा आहे आणि आपल्या संरक्षण व्यवस्था स्वतंत्र करण्याचा प्रयत्न आहे.

बांगलादेशात चीनचा गुप्त कट?

पण चीनचा खेळ केवळ युध्दभूमीपुरता मर्यादित नाही. बांगलादेशात चीन गुप्त कट रचतोय. सिलीगुडी कॉरिडॉर जवळील हवाई तळ चीनच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगण्यात येतंय. जर हे खरे ठरले, तर भारताच्या पूर्वेकडील सुरक्षेला मोठा धोका निर्माण होईल.

चीनच्या या पावलंमुळे फक्त सीमा भागात नाही, तर सागर मार्गांवरही तणाव वाढला आहे. चीनच्या संशोधन नौका हिंद महासागरात प्रवेश करत आहेत, ज्या भारताच्या मिसाईल चाचणी भागांपर्यंत पोहोचत आहेत. चिनी युद्धनौका वारंवार आपल्या सागरी हद्दीत घुसखोरी करत असल्याचंही स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने इंडो-पॅसिफिक भागात आपली उपस्थिती वाढवली आहे, जिथे चीनने आधीच लष्करी तळ उभे केले आहेत.

व्यापार आणि अर्थकारण

चीनच्या आक्रमकतेचं दुसरं रूप म्हणजे व्यापार आणि अर्थकारण. चीनकडून भारतात होणारी आयात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चीनसोबत व्यापार तफावत 99 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. याचा थेट फटका आपल्या देशातील एमएसएमई उद्योगांना बसतोय, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणि स्थानिक उत्पादक संकटात आले आहेत.

चिनी वस्तू स्वस्त असल्या तरी त्या धोकादायक ठरतात. निकृष्ट दर्जा, सुरक्षेचा अभाव आणि स्थानिक उत्पादकांना टाकणारा धोका हे त्याचे पैलू आहेत. शिवाय, चीन माहिती युद्धही राबवत आहे. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवून, भारताच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अहवालानुसार, चीनने या सायबर युध्दात अब्जावधी डॉलर्स टाकले आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट आहे , भारतासाठी खरी चिंता पाकिस्तान नव्हे, तर चीन आहे. आजचा संघर्ष केवळ रणांगणावरचा नसून तो आर्थिक, तांत्रिक, मानसिक आणि रणनीतीच्या अनेक पातळ्यांवर चालतोय. भारताला आता या सर्व आघाड्यांवर सज्ज राहावं लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe