अनेकदा आपण एखादा पक्षी पाहतो, त्याचा गूढ आवाज ऐकतो आणि काहीतरी वेगळं वाटून जातं. काही आवाज आपल्याला आनंद देतात, तर काही भिती वाटतात. गावकुसाबाहेर किंवा नदीकिनारी ऐकू येणाऱ्या टीटवी पक्ष्याच्या आवाजानं अशीच एक खास भावना निर्माण होते.ग्रामीण भागात या पक्ष्याच्या आवाजाला विशेष महत्त्व दिलं जातं.

काहींना वाटतं की या पक्ष्याच्या ओरडण्यामागे काहीतरी अनिष्ट संकेत असतो, तर काहीजण त्याला केवळ निसर्गाचा एक भाग मानतात. पण या पक्ष्याबद्दल असलेली लोकश्रद्धा मात्र पिढ्यानपिढ्या तशीच राहिली आहे थोडीशी रहस्यमय, थोडीशी भीतीदायक.
टीटवी दिसायला साधारण असली तरी तिचा आवाज खूपच कडक आणि घातक वाटतो. त्यामुळेच गावात हा पक्षी दिसला किंवा त्याचा आवाज घुमला, की अनेकांना धडकी भरते. “काहीतरी वाईट घडणार ” अशी भीती मनात निर्माण होते.
विशेषतः जर तो पक्षी घराजवळ किंवा छतावरून ओरडत असेल, तर त्याला अधिकच अशुभ मानलं जातं. टीटवीला इंग्रजीत सॅंडपायपर म्हणतात आणि तो सामान्यतः तलाव, पाणथळ जागा किंवा ओलसर जमिनीत राहतो.
टीटवी संबंधित लोककथा
या पक्ष्याशी संबंधित असलेल्या लोककथा आणि श्रद्धा फार जुन्या आहेत. वडीलधारी मंडळी सांगतात की टीटवी जर सतत एका ठिकाणी ओरडत असेल, तर तो एखाद्या संकटाचा, वादाचा किंवा दुर्दैवाचा संकेत असतो. काही तर थेट मृत्यूचाही अंदाज व्यक्त करतात. त्यामुळे गावात टीटवी पक्षी ओरडायला लागला, की लोक देवासमोर दिवा लावतात, मुळात त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करायला देखील घाबरतात.
टीटवी पक्ष्याच्या अंड्यांबद्दलही अनेक कथा आहेत. काहींना वाटतं की टीटवी जेव्हा अंडी घालतो, तेव्हा लवकरच पावसाळा सुरू होणार असतो. तर काहीजण म्हणतात की त्याचा घरावर फेरफटका मारणे दुर्दैवाचं लक्षण आहे. काहींच्या मते, एखादा पक्षी नैसर्गिकपणे कितीही निरुपद्रवी असला तरी त्याच्या वर्तनावरून काही गोष्टींची कल्पना लावता येते.
शास्त्रीय दृष्टिकोन
शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, टीटवीच्या आवाजामागे काहीही अशुभ नसतं. त्याचा आवाज नैसर्गिकदृष्ट्या मोठा वाटू शकतो, पण तो कोणत्याही अपघाताचं कारण ठरत नाही. मात्र गावांमध्ये विज्ञानापेक्षा अनुभवाला आणि श्रद्धेला अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच या पक्ष्याच्या आवाजानं भीती अजूनही मनात घर करून बसलेली आहे.