जग झोपेत असताना निसर्ग कधी जागा होतो आणि त्याचा कोप केव्हा प्रचंड नुकसान करून जातो, हे कोणालाही सांगता येत नाही. भूकंपसारख्या नैसर्गिक आपत्ती अचानक येतात आणि जीवघेणा थरार मागे ठेवून जातात. पण कल्पना करा, जर तुमच्या हातातल्या मोबाइल फोननेच तुम्हाला काही क्षण आधीच सावध करून दिले, तर? होय, हे आता शक्य झालं आहे. गुगलने अशाच एका अनोख्या आणि जीवनरक्षक प्रणालीचा शोध लावला आहे. Android Earthquake Alert System, जी आता जगभरात लोकांचे जीव वाचवण्यासाठी सज्ज झाली आहे.

काय आहे Android Earthquake Alert System?
याची सुरुवात 2020 मध्ये झाली. या सिस्टमची कल्पना तशी साधी होती, स्मार्टफोनमध्ये आधीच असलेले सेन्सर वापरून भूकंपाचा अंदाज लावायचा आणि वापरकर्त्याला लगेचच सूचित करायचं. पण साध्या कल्पनेतून निघालेलं हे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांसाठीदेखील विस्मयकारक ठरलं आहे. कारण ही प्रणाली कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय, कोणताही महागडा यंत्रसामान न लावता, प्रत्येक अँड्रॉइड युजरपर्यंत पोहोचली आहे.
पूर्वी भूकंपाचं भाकीत सांगणारी यंत्रे खूप महागडी असायची आणि ती केवळ काही विशिष्ट ठिकाणीच बसवली जायची. त्यामुळे सामान्य माणसाला वेळेवर माहिती मिळणं कठीण होतं. मात्र आता, गुगलच्या या प्रणालीमुळे प्रत्येकाच्याच हातात भूकंपाचा संभाव्य इशारा मिळतोय. आज ही प्रणाली तब्बल 98 देशांमध्ये कार्यरत आहे आणि सुमारे 2.5 अब्ज लोकांना कव्हर करत आहे. ही Android Earthquake Alert System स्मार्टफोनच्या एक्सेलेरोमीटर सेन्सरचा वापर करून जमिनीतील सूक्ष्म कंपन लगेच ओळखते.
जगभरात 2 अब्जांपेक्षा अधिक अँड्रॉइड डिव्हाइस
2021 ते 2024 या तीन वर्षांत या प्रणालीने 1.9 ते 7.8 रिश्टर तीव्रतेचे सुमारे 312 भूकंप नोंदवले आहेत. हे आकडे पाहूनच या सिस्टमची कार्यक्षमता लक्षात येते. यामागचं गणितही साधं आहे. जगभरात 2 अब्जांपेक्षा अधिक अँड्रॉइड डिव्हाइस आहेत. हे प्रत्येक डिव्हाइस जणू छोटं भूकंप शोधकच बनलं आहे.
शास्त्रज्ञ म्हणतात, ही प्रणाली भविष्यात आणखी अचूकता साधेल आणि आणखी वेगाने इशारे देऊ शकेल. गुगलचं हे पाऊल केवळ टेक्नोलॉजिकल क्रांतीच नाही, तर माणुसकीसाठीचा एक मोठा आधार ठरत आहे. निसर्गाच्या रौद्र रूपाशी सामना करताना, तंत्रज्ञानानं आता थोडं तरी वेळेपूर्वी सावध राहण्याची संधी आपल्याला दिली आहे, तीही आपल्या खिशात असलेल्या मोबाईलद्वारे.