श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, शुद्धतेचा आणि भोलेनाथाच्या चरणी मनोभावे अर्पण करण्याचा काळ. या काळात घरात सकारात्मक ऊर्जा वाढावी, सुख-शांती नांदावी, अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. पण अनेकदा आपण अनावधानाने काही गोष्टी आपल्या पूजाघरात ठेवतो, ज्या आपल्या घरातील चैतन्याला मंदावू शकतात. विशेषतः श्रावण सुरू होण्यापूर्वी या गोष्टींचं वेळेत विसर्जन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पूजास्थळ हे फक्त देवतांचं स्थान नसतं, तर तिथं घराच्या ऊर्जेचा स्रोतही असतो.

तुटलेल्या मूर्ती
आपल्या श्रद्धेने आपण देवतांच्या मूर्ती किंवा फोटो पूजाघरात ठेवतो, पण काळाच्या ओघात ते कधी तुटतात, तर कधी फाटतात. अशा अवस्थेतही काही वेळा ते तिथेच राहतात. हे टाळायला हवं. शिवपुराणात स्पष्ट सांगितलं गेलं आहे की तुटलेल्या मूर्ती किंवा खराब चित्र पूजास्थळी ठेवणं अशुभ असतं. त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि घरातील सकारात्मकतेवर त्याचा थेट परिणाम होतो.
सुकलेली फुले
तसंच, दररोज देवाला अर्पण केलेली फुलं तीही काळजीपूर्वक बदलणं आवश्यक आहे. काही वेळा त्या वाळतात, तरी त्या पूजास्थळी राहतात. पण श्रावण महिन्यात अशा शिळ्या फुलांचा वापर टाळणं अत्यावश्यक आहे. कारण हा महिना फक्त व्रताचा नाही, तर आध्यात्मिक स्वच्छतेचा असतो. फुलं ही देवतेची सेवा असते, ती ताजी, सुवासिक आणि मनापासून अर्पण केलेली असावी.
दिव्यतील वाती
दिवा आणि त्यातलं तेलही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक वेळा दिव्यात अर्धवट जळालेला कापूस, शिळं तेल राहून जातं. त्याचं दररोज नूतनीकरण होणं गरजेचं आहे. अन्यथा, पूजास्थळी एक प्रकारचीचा जडपणा आणि साचलेली ऊर्जा निर्माण होते.
पूजा घराची अस्वच्छता
हवन, धूप किंवा अगरबत्तीची राखही पूजाघरात तशीच राहिल्यास, ती उर्जेचं शोषण करते. अशा राखेला वेळोवेळी काढून टाकणं, आणि पूजास्थान नेहमी स्वच्छ, निर्मळ ठेवणं यामुळे तिथल्या वातावरणात शुद्धता टिकते.
कधीमधी पूजेसाठी वापरलेले जुने कपडे, देवांचे झुळझुळीत वस्त्र किंवा आसन हे फाटलेले किंवा मळलेले असतील, तर त्याचा परिणाम केवळ पूजास्थळीच नाही, तर मानसिकतेवरही होतो. पूजास्थळावरून असे कपडे बाजूला काढून तिथे स्वच्छ, नवे वस्त्र अर्पण करणं यामुळे घरात सकारात्मकता वाढते.
रिकामे डब्बे
अनेकदा आपण पूजाघरात रिकामे डब्बे, कोरड्या माळा, तुटलेली घंटा किंवा प्रसादाचे डबे ठेवतो. ह्या वस्तू जरी गरजेच्या वाटल्या तरी त्या पूजाघरात अनावश्यक जागा व्यापतात आणि ऊर्जेचा प्रवाह रोखतात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी या गोष्टींना योग्य जागा देणं किंवा त्यांचं विसर्जन करणं हे घरातील सौख्यासाठी आवश्यक आहे.
शिवपुराणात भोलेनाथाच्या भक्तीचा अर्थ केवळ उपवास किंवा पूजन नाही, तर मन, घर आणि वातावरण यांची शुद्धता हेही त्याचं रूप मानलं गेलं आहे. म्हणूनच, श्रावणच्या आगमनाआधी आपल्या पूजाघरात लक्ष घालणं, तिथल्या गोष्टी तपासून पाहणं, अनावश्यक वस्तू काढून टाकणं आणि त्या जागेला चैतन्याने परिपूर्ण करणं ही खरी भक्ती ठरते.