श्रावण महिना जसाजसा जवळ येतो, तसतशी भक्तांच्या मनात एक वेगळीच भक्तिभावाने भरलेली ऊर्जा जाणवू लागते. या महिन्याचे वेगळेपण म्हणजे ‘कावड यात्रा’. गंगाजल आणून भगवान शिवावर अभिषेक करण्याची ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून, त्यामागे असलेली श्रद्धा, त्याग, संयम आणि भक्ती यांची तीव्र अनुभूती आहे. 2025 मध्ये कावड यात्रा 11 जुलैपासून सुरू होणार असून, देशभरातून लाखो शिवभक्त पायी चालत गंगाजल आणण्यासाठी निघतील.

या यात्रेचे महत्त्व फक्त श्रावण महिन्यात गंगाजल आणण्यात नाही, तर ती एक साधना आहे शरीराची, मनाची आणि आत्म्याची. शेकडो किलोमीटरचा प्रवास, उन्हाचा कडाका, अनवाणी पाय, तरीही मुखावर असते ‘हर हर महादेव’चा जयघोष. कारण या भक्तांना वाटतं, शिवाला दिलेलं गंगाजल म्हणजे त्यांच्या जीवनातल्या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग.
कावड यात्रेची सुरुवात कधी झाली?
पण या यात्रेची सुरुवात नक्की कशी झाली, हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे. काही पौराणिक कथांनुसार, कावड यात्रा सर्वप्रथम परशुराम यांनी सुरू केली. ते गर्मुक्तेश्वर धामाहून गंगाजल घेऊन आले आणि ते उत्तर प्रदेशातील पुरा गावात जाऊन भगवान शिवावर अर्पण केलं. विशेष म्हणजे तेव्हा श्रावण महिना सुरू होता, आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असं मानलं जातं.
मात्र काही कथा त्रेता युगापर्यंत मागे जातात. त्या काळात श्रवण कुमारने आपल्या वृद्ध आणि अंध पालकांना गंगेत स्नान घालण्यासाठी खांद्यावर कावड ठेवून हरिद्वारचा प्रवास केला होता. त्याच्या त्या त्यागमयी यात्रेने देवसुद्धा प्रभावित झाले होते. त्यामुळे श्रवण कुमारलाही पहिला कावडिया मानलं जातं.
यात्रेचे नियम
कावड यात्रेचे काही कठोर पण भक्तिभावाने भरलेले नियमही आहेत. उदा, कावड घेणारा व्यक्ती संपूर्ण यात्रा अनवाणी पार करतो. गंगाजल भरल्यानंतर ती कावड कुठेही जमिनीवर ठेवली जात नाही. शिवाय, यात्रा सुरू करताच तो ‘कावडिया’ बनतो आणि त्याचे कुटुंबीयही त्याच्यासोबत पूजा, पाठ आणि उपवास आदी करत राहतात.
आजही उत्तर भारतात विशेषतः हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी, गया, देवघर अशा धार्मिक स्थळांवर श्रावणमध्ये कावड यात्रा उत्सवासारखी भरते. पोलिस सुरक्षा, वैद्यकीय सेवा, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक यामध्येही ही यात्रा एक सामूहिक भावना जागवते.