आपण कितीही सज्जन, आकर्षक आणि आत्मविश्वासू असलो, तरी तोंडातून येणाऱ्या वाईट वासामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात क्षणात आपली प्रतिमा गडगडू शकते. ही दुर्गंधी अनेक कारणांनी येऊ शकते. अनेकदा आपल्यालाच कल्पना नसते की हे आपल्या दैनंदिन सवयींशी संबंधित असू शकते.

तोंड स्वच्छ ठेवण्यात हलगर्जीपणा हा सर्वात मोठा दोष असतो. दात नीट न घासणे, जीभ साफ न करणे किंवा दिवसात अनेक वेळा पाणी न पिणे या सवयीमुळे तोंडात बॅक्टेरियांचे प्रमाण वाढते. हे बॅक्टेरिया अन्नकणांवर प्रक्रिया करून दुर्गंधी निर्माण करतात. त्यात जर आपला आहारही कांदा, लसूण, किंवा तीव्र मसाल्यांनी भरलेला असेल, तर तो वास अधिक काळ तोंडात टिकतो.
बडीशेप खाणे
पण या त्रासावर काही अतिशय प्रभावी आणि पारंपरिक उपायही आहेत, जे आजही लाखो लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहेत. उदाहरणार्थ, जेवल्यानंतर बडीशेप खाणे ही आपल्याकडे जुनी पद्धत आहे. ती केवळ चवीनिमित्त नाही, तर तोंडाचा वास ताजा ठेवण्यास आणि पचनास मदत करण्यासाठी आहे. बडीशेपमधील नैसर्गिक तेलं तोंडाला शीतलता देतात आणि ताजेपणा टिकवतात.
लवंग आणि वेलची
लवंग आणि वेलची हेही असेच दोन शक्तिशाली घटक आहेत, जे श्वासाला ताजेपणा देतात आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. एक किंवा दोन लवंगा चावल्यास, त्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडात वास निर्माण करणाऱ्या घटकांवर काम करतात.
पुरेसे पाणी पिणे
अजून एक प्रभावी उपाय म्हणजे पाणी. पुरेसे पाणी पिणे ही सर्वात मूलभूत पण दुर्लक्षित गोष्ट आहे. पाण्यामुळे लाळेचं उत्पादन सुरळीत होतं आणि तोंडात साचलेले बॅक्टेरिया आणि अन्नकण बाहेर टाकले जातात. तोंडात कोरडेपणा आला की वास वाढतो, म्हणून दिवसभर थोडं थोडं पाणी पिणं फारच उपयोगी ठरतं.