सध्या कसोटी क्रिकेटमधील एक जुना नियम चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, तो म्हणजे 80 षटकांनंतर नवीन चेंडू घेण्याचा नियम. गेले अनेक दशके खेळात या नियमाने आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. पण आता, खेळाच्या बदलत्या स्वरूपामुळे हा नियम कितपत योग्य आहे, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 45 वर्षांपूर्वी बनवलेला हा नियम आता कालबाह्य वाटतोय का, यावर क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.

क्रिकेट हा खेळ सतत बदलत चालला आहे. तसं कसोटी क्रिकेट हा संयमाचा खेळ मानला जाई, पण आता कसोटी क्रिकेटही अधिक आक्रमक होत चाललं आहे. फलंदाज पहिल्यापासून आक्रमक खेळ करतात, चेंडूला सीमापार नेण्याचा प्रयत्न करतात आणि स्टँडपर्यंत फटका मारण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. याचा परिणाम चेंडूवर होतो, तो लवकर मऊ होतो, त्याचा आकार बदलतो आणि गोलंदाजांसाठी तो फारसा उपयोगी राहत नाही.
भारत-इंग्लंड सामन्यात काय घडलं?
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत खेळतो आहे. पहिल्याच सामन्यात भारताने केवळ 14व्या षटकात चेंडू बदलण्याची मागणी केली होती. पंचांनी ती मागे टाकली, पण अखेर 28व्या षटकात चेंडू बदलण्यात आला. दुसऱ्या सामन्यातही अशीच स्थिती पाहायला मिळाली, जिथे इंग्लंडने 16व्या षटकापासूनच नवीन चेंडूची मागणी सुरू केली होती, जी अखेर 56व्या षटकात मान्य झाली.
या पार्श्वभूमीवर ड्यूक बॉलचे उत्पादक दिलीप जाजोदिया यांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या मते, आजच्या काळात चेंडूवर दोष टाकणं ही एक फॅशन झाली आहे. गोलंदाज आणि कर्णधार जेव्हा विकेट मिळवत नाहीत, तेव्हा ते पंचांवर दबाव टाकतात आणि चेंडू बदलण्यासाठी सतत प्रयत्न करतात. मात्र, ते म्हणतात की आजचा खेळच इतका आक्रमक झालाय की चेंडूचे जास्त काळ टिकणं अवघड झालं आहे.
1980 सालापासूनचा नियम बदलणार?
जाजोदिया यांचं असंही म्हणणं आहे की सध्याचा नियम 1980 सालापासून कायम आहे आणि आता त्यात बदल होण्याची गरज आहे. त्यांचा असा विश्वास आहे की 60 किंवा 70 षटकांनंतर नवीन चेंडू घेता यावा असा नवीन नियम बनवायला हवा, जेणेकरून खेळ अधिक संतुलित राहील आणि गोलंदाजांना देखील संधी मिळेल. विशेषतः सपाट खेळपट्ट्या, जोरदार फटकेबाजी आणि अधिकाधिक आक्रमक फलंदाजीमुळे चेंडू लवकर खराब होतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
आता आयसीसीसमोर मोठं आव्हान आहे, जुन्या नियमांना नव्या काळात फिट बसवण्याचं. 80 षटकांनंतर चेंडू बदलण्याचा नियम किती काळ टिकेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या नवीन नियमाबाबत आता क्रिकेट विश्वात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.