जगभरातील महासत्तांमध्ये सामर्थ्याची शर्यत सुरुच असते, आणि या स्पर्धेत अमेरिका नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि अतिशय घातक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अमेरिकेने आपल्या सामरिक क्षमतेचा असा एक आरसा उभा केला आहे की, इतर देशांनाही त्याचा सन्मान ठेवावा लागतो. याच क्षमतेचे प्रतीक म्हणजे मिनिटमॅन-3 अमेरिकेचे आतापर्यंत न वापरलेले, पण अतिशय घातक असे आंतरखंडीय क्षेपणास्त्र. जगात कितीही तणाव वाढला तरी, अमेरिकेने या क्षेपणास्त्राचा वापर कधीच केला नाही, हेच त्याचे गांभीर्य दाखवून देते.

मिनिटमॅन-3 क्षेपणास्त्र
मिनिटमॅन-3 हे फक्त एक क्षेपणास्त्र नाही, तर ते एक संपूर्ण प्रणाली आहे जी अत्याधुनिक विज्ञान आणि सामरिक नीती यांचे मिश्रण आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची व्याप्ती सुमारे 10,000 किलोमीटरपर्यंत हे लक्ष्य गाठू शकते. अमेरिकेच्या जमिनीवरून उडालेलं हे शस्त्र थेट रशिया किंवा चीनसारख्या दूरवरच्या देशांपर्यंत पोहोचू शकतं. या अंतरामुळे हे जगातल्या सर्वांत प्रभावशाली क्षेपणास्त्रांपैकी एक मानलं जातं.
मिनिटमॅन-3 चा वेग आणि शक्ती
याचं आणखी एक भीषण अंग म्हणजे त्याचा वेग. मिनिटमॅन-3 ताशी तब्बल 24,000 किलोमीटरचा वेग गाठू शकतं. इतक्या प्रचंड वेगाने उड्डाण करणाऱ्या या क्षेपणास्त्राला कोणतंही पारंपरिक हवाई संरक्षण अडवू शकत नाही. जेव्हा हे शस्त्र हवेत झेप घेतं, तेव्हा ते अक्षरशः विजेसारखं आकाश फाडतं आणि काही मिनिटांतच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतं.
याच्या किमतीकडे पाहिलं तर एक मिनिटमॅन-3 सुमारे 7 दशलक्ष डॉलर्स इतकं महागडं आहे. पण अमेरिका या सुरक्षेच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून सध्या अमेरिकेकडे याचे जवळपास 530 सक्रिय युनिट्स आहेत.
मिनिटमॅन-3 ची क्षमता
या क्षेपणास्त्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची अणुहल्ला क्षमता. मिनिटमॅन-3 मध्ये एकावेळी तीन स्वतंत्र वॉरहेड्स बसवता येतात, म्हणजेच एकाच वेळी वेगवेगळ्या तीन ठिकाणी अणुबॉम्बचा हल्ला केला जाऊ शकतो. ही गोष्ट युद्धाच्या शक्यतेचा विचार करता अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे.
हे क्षेपणास्त्र अमेरिकन कंपनी बोईंग डिफेन्सने विकसित केले आहे आणि याला इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजेच ICBM या प्रकारात समाविष्ट केलं जातं. अमेरिकेच्या संरक्षण धोरणाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून, त्याचा उद्देश केवळ शक्ती दाखवण्यापुरता मर्यादित नाही, तर जागतिक स्थैर्य राखण्याचा संदेश देखील यातून दिला जातो.