पालक, कोबी की मशरूम…; पावसाळ्यात कोणत्या भाज्या आरोग्यासाठी घातक ठरतात?, जाणून घ्या

Published on -

पावसाळा म्हणजे हिरवीगार सृष्टी, हवेत गारवा आणि मनाला सुखावणारे निसर्ग सौंदर्य… पण या ऋतूचं एक वेगळं रूपही आहे आजारपणाचं. कारण ज्या पावसाच्या थेंबांनी सृष्टी सजते, त्याच पाण्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये जराही हलगर्जीपणा झाला, तर त्याचे परिणाम थेट आपल्या तब्येतीवर उमटतात. विशेषतः काही भाज्या या काळात तुमच्या तब्येतीसाठी नुकसानदायक ठरू शकतात.

पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणात ओलावा खूप जास्त असतो, त्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशींसाठी हे वातावरण फारच अनुकूल ठरतं. विशेषतः जेवणात वापरल्या जाणाऱ्या काही भाज्यांमध्ये या हानिकारक घटकांची वाढ लवकर होते. अशा भाज्या जर नीट धुतल्या किंवा शिजवल्या नाहीत, तर त्या पचनाच्या त्रासांपासून ते अन्नातून विषबाधा होईपर्यंत गंभीर परिणाम घडवू शकतात.

कोणत्या पालेभाज्या खाऊ नयेत?

उदाहरणच घ्यायचं झालं, तर पालेभाज्या जसे की पालक, मेथी, राजगिरा आणि मोहरी या सामान्यतः आरोग्यासाठी फायदेशीर असल्या, तरी पावसाळ्यात त्यांच्या पानांमध्ये चिखल, कीटकांची अंडी, बुरशीसारख्या गोष्टी चिकटलेल्या असतात. कितीही धुतल्या तरी सर्व बॅक्टेरिया नष्ट होतीलच याची खात्री नसते. परिणामी, अतिसार, पोटदुखी आणि संसर्ग यासारखे त्रास निर्माण होतात.

कोबी आणि फुलकोबीसारख्या फुलांच्या भाज्या याही धोका वाढवतात. त्यांचं जाळीदार बांधकाम आणि आतमध्ये अडकलेली माती, घाण, बुरशी, कीटक हे सगळं योग्य स्वच्छता न केल्यास शरीरात घातक परिणाम घडवू शकतं. त्याचप्रमाणे मशरूमही ओल्या हवामानात लवकर कुजतात. वरून ताजे दिसले तरी आतून बिघडलेले असू शकतात. त्यांचं खाणं म्हणजे अन्न विषबाधेला आमंत्रणच.

कोणत्या फळभाज्या खाऊ नयेत?

वांगीसारख्या भाज्याही या ऋतूत फारशा शिफारस केल्या जात नाहीत. मातीतील कीटकांमुळे त्यावर बारीक जंतुसंसर्ग असू शकतो, जो नुसत्या धुण्याने जाऊ शकत नाही. त्यामुळे गॅस, अपचन, पोटात जळजळ होणं हे त्रास वाढतात. भेंडीसारख्या चिकट भाज्या तर पावसात अधिक निसरड्या होतात, ज्यामुळे त्यावर बुरशी सहज वाढते. आणि अंकुरलेले मूग, चणे जर कच्चे खाल्ले गेले, तर साल्मोनेला सारखे जीवाणू हल्ला करू शकतात.

मग काय आणि कसे खायला हवे?

पण याचा अर्थ असा नाही की पावसाळ्यात भाजी खाणं थांबवावं! खबरदारी घेतली तर तुम्ही या ऋतूचा आनंद घेतच निरोगी राहू शकता. उदाहरणार्थ, भोपळा, कारला, परवल, टिंडा यासारख्या भाज्या शिजवायला सोप्या आहेत आणि पचायला हलक्याही. त्या व्यवस्थित धुऊन आणि चांगल्या उकळत्या पाण्यात शिजवल्यास या तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी चांगला पर्याय ठरतील.

भाज्या स्वच्छ करताना कोमट पाण्यात मीठ किंवा थोडं व्हिनेगर घालून त्यात 15-20 मिनिटं भिजवा. नंतर त्या स्वच्छ धुवून मोठ्या आचेवर चांगल्या शिजवा. अशा पद्धतीने शिजवलेले अन्न पावसाळ्यात अधिक सुरक्षित आणि पचायला सोपं ठरतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!