1965 चं युद्ध, कारगिलचं रणांगण…’या’ रेजिमेंटचं नाव ऐकताच पाक सैन्याचा थरकाप उडतो! वाचा त्यांची शौर्यगाथा

Published on -

भारतीय सैन्य हे केवळ एक शिस्तबद्ध संघटन नसून, ते आपल्या देशाच्या संरक्षणाचं साक्षात जिवंत रूप आहे. या सैन्यात असलेल्या विविध रेजिमेंट्स जरी आपापल्या ध्येयावर निष्ठावान असल्या, तरी त्यातली एक अशी रेजिमेंट आहे जिने आपल्या पराक्रमाने इतिहासात अनेकदा सुवर्णाक्षरात आपलं नाव कोरलं आहे ती म्हणजे ‘जाट रेजिमेंट’. जिच्या शौर्याच्या कथा फक्त युद्धभूमीपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या थेट राष्ट्राच्या हृदयात कोरल्या गेल्या आहेत. जाट रेजिमेंटचं नाव जरी घेतलं, तरी समोरचं पाकिस्तानी सैन्य हादरून जातं, एवढा दबदबा या रेजिमेंटने कमावला आहे.

‘जाट रेजिमेंट’ची स्थापना

भारताच्या सैन्यात सध्या 27 रेजिमेंट्स कार्यरत आहेत, आणि त्यापैकी जाट रेजिमेंट ही सर्वात मोठी आहे. तिचा इतिहास फारच जुना असून, तिची स्थापना तब्बल 1795 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली होती. आज तिचं मुख्यालय उत्तर प्रदेशमधल्या बरेली शहरात आहे, जिथून ही रेजिमेंट आपलं दैनंदिन प्रशिक्षण आणि रणनीतीची आखणी करते. पण केवळ इतिहास आणि संख्या यामुळेच तिचं महत्त्व नाही. जाट रेजिमेंटनं वेळोवेळी जे शौर्य दाखवलं आहे, त्याने तिला अनेक पदकांनी गौरविण्यात आलं आहे.

एवढ्या वर्षांच्या सेवेत जाट रेजिमेंटला 6 वीरचक्र, 8 अशोकचक्र आणि 4 महावीरचक्र मिळाले आहेत. याशिवाय तिला 32 युद्ध सेवा पदकांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. हे आकडे केवळ सन्मानच दर्शवत नाहीत, तर ज्या संकटकाळात रेजिमेंटने देशासाठी जीवाची पर्वा न करता लढा दिला, त्याचा एक पुरावा आहेत.

‘जाट रेजिमेंट’ची शौर्यगाथा

जाट रेजिमेंटचं युद्धघोष ‘जाट बलवान, जय भगवान’ हा केवळ एक नारा नाही, तर एक जोश, एक गर्जना आहे. युद्धभूमीत ही गर्जना ऐकली की, समोरचं शत्रुसैन्य हादरून जातं. आणि यामागे आहे त्या रेजिमेंटची जीव ओतून केलेली शौर्यगाथा, ज्यांनी पाकिस्तानसारख्या शत्रूला अनेकदा पराभूत केलं आहे.

1965 चं भारत-पाकिस्तान युद्ध हे जाट रेजिमेंटच्या इतिहासात एक सुवर्णपान आहे. याच युद्धात त्यांनी लाहोरजवळील डोगराई या महत्त्वाच्या ठिकाणावर दोन वेळा कब्जा केला होता. पहिल्यांदा परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने माघार घ्यावी लागली, मात्र दुसऱ्यांदा परत त्यांनी ती खिंड आपल्या नियंत्रणाखाली आणली. हे केवळ ताकदीनं नव्हे, तर असामान्य रणनीती आणि धाडसाचं उदाहरण होतं.

कारगिल युद्धादरम्यानसुद्धा जाट रेजिमेंटने शौर्याची नवीन परिभाषा लिहिली. त्यांनी तब्बल 4,540 फूट उंच टेकडीवर कब्जा मिळवला होता. त्यावेळी ज्या प्रकारे शत्रूच्या गोळ्यांच्या वर्षावात त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली, ते पाहून सारा देश स्तब्ध झाला होता. त्या युद्धातील त्यांच्या पराक्रमाचा सन्मान म्हणून बरेलीत एक संग्रहालय उभारण्यात आलं आहे, जे त्या ऐतिहासिक लढ्याची साक्ष देतं.

पाकिस्तानसोबत अनेक वेळा शांतता करार झाले, पण त्यांनी वारंवार त्याचं उल्लंघन केलं. मात्र, भारताने प्रत्येक वेळेस संयम राखत योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उत्तर दिलं. आणि अशा प्रत्येक वेळी, जाट रेजिमेंटसारख्या पराक्रमी सैनिकांनी पुढाकार घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!