घराच्या कुंपणावर किंवा बाल्कनीच्या कठड्यावर फुलणारी गुलाबी-पांढऱ्या रंगाची सुंदर फुलं पाहिली की मन प्रसन्न होतं. हीच ती मधुमालती दिसायला मोहक आणि गुणधर्मांनी भरलेली एक आश्चर्यकारक औषधी वनस्पती! बहुतेकांना ती केवळ शोभेची फुलझाड वाटते, पण तिच्यामध्ये दडलेले आयुर्वेदिक फायदे खूपच प्रभावी आणि आरोग्यदायी आहेत.

मधुमालतीच्या प्रजाती
मधुमालती म्हणजे फक्त फुलांची सजावट नाही, तर एक नैसर्गिक औषधगुणांचा खजिना आहे. आयुर्वेदात हिचा वापर त्वचेच्या समस्यांपासून मधुमेहापर्यंत अनेक त्रासांवर केला जातो. तिचे सौंदर्य जितके मनमोहक आहे, तितकाच तिचा प्रभाव आरोग्यावर जबरदस्त आहे. विशेषतः मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांमध्ये ती उपयुक्त ठरते. मधुमेह नियंत्रणासाठी मधुमालतीच्या फुलांचा किंवा पानांचा रस घेतल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम दिसतो, असं आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात.
मधुमालती ही फक्त भारतातच नव्हे तर फिलिपाइन्स, मलेशिया, चीन, युरोप आणि अमेरिकेतही आढळते. जगभरात या वनस्पतीच्या सुमारे 180 प्रजाती आहेत. त्यातील 20 भारतातही आढळतात. इंग्रजीत हिला Rangoon creeper, तर चिनी भाषेत हनीसकल म्हणतात. तिचं शास्त्रीय नाव आहे Combretum indicum, आणि ती ‘Caprifoliaceae’ कुटुंबातील आहे. विविध भाषांमध्ये वेगवेगळी नावे असली तरी तिच्या औषधी गुणधर्मांबाबत एकवाक्यता आहे , ती शरीराला बरेच फायदे देते.
मधुमालतीचे फायदे
प्राचीन आयुर्वेद ग्रंथ ‘रसजलनिधी’मध्येही मधुमालतीचा उल्लेख सापडतो. खोकला आणि सर्दीच्या त्रासासाठी तिचा वापर काढा तयार करून केला जातो. तुळशीची पानं, मधुमालतीची फुलं, लवंग आणि थोडंसं पाणी एकत्र करून तयार केलेला हा काढा दिवसातून 2-3 वेळा घेतल्यास सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा एक जुना घरगुती उपाय असूनही आजच्या काळातही तेवढाच प्रभावी आहे.
तिच्या दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्मांमुळे संधिवातामुळे होणाऱ्या वेदना आणि सांध्यांतील सूज यावरही ती उपयुक्त ठरते. मधुमालतीची 5-6 पानं किंवा फुलांचा रस दिवसातून दोनदा घेतल्यास सांधेदुखीच्या त्रासात हळूहळू आराम मिळतो. ही वनस्पती शरीरात साखरेचे प्रमाण कमी करण्यास हातभार लावते, त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ती उपयोगी ठरू शकते.
मात्र, कोणत्याही आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. प्रत्येकाची शारीरिक प्रकृती वेगळी असते, त्यामुळे डोस, वापरण्याची वेळ आणि पद्धत ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच ठरवावी.