इतिहासातील सर्वात मोठा खजिना! एका राजाच्या थडग्यात मिळाली इतकी संपत्ती की, मोजायलाच लागली तब्बल 10 वर्ष

Published on -

इजिप्तमधील राजांची दरी (Valley of the Kings) ही जागा केवळ इतिहासाच्या अभ्यासकांसाठी नाही, तर संपूर्ण जगभरातील पुरातत्व तज्ज्ञांसाठी आकर्षणाचे आणि गूढतेचे केंद्र आहे. खूप वर्षांपासून वाळवंटासारखी शांत असलेली ही इजिप्तची राजांची दरी पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांमध्ये गाजू लागली, आणि त्याचे कारणही तितकेच थक्क करणारे आहे. इथेच सापडला होता तो थडगा, ज्यात इतका प्रचंड खजिना होता की त्याला मोजण्यासाठी तब्बल 10 वर्षे लागली.

हे केवळ एक साधं पुरातत्व उत्खनन नव्हतं, तर हा एक असा शोध होता ज्याने जगभरात इतिहासप्रेमी, संशोधक आणि सामान्य लोकांमध्येही एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली.

इजिप्तमधील राजांची दरी

दक्षिण इजिप्तमधील नाईल नदीच्या काठावर वसलेल्या या दरीत प्राचीन काळात इजिप्तच्या राजांची म्हणजेच फारोंची थडगी बांधली गेली होती. याच दरीत 1922 साली ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर याने जगाला चकित करणारा शोध लावला, राजा तुतनखामेनचं थडगं. हा शोध त्याच्यासाठीही अनपेक्षित होता. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर जेव्हा कार्टरच्या टीमचा फावडा वाळूमध्ये एका कठड्याला जाऊन लागला, तेव्हा त्यांना जे मिळालं ते इतिहासाच्या दृष्टीने अनमोल होतं.

 

या थडग्यात एका छोट्याशा दरवाजामागे एक अख्खं जग लपलेलं होतं. आत उतरल्यावर कार्टरला चार खोल्या सापडल्या. त्यात कपडे, सोन्याचे अलंकार, रथ, पलंग, दागदागिने आणि अगदी मनोरंजनासाठी वापरली जाणारी खेळणीसुद्धा होती. या सर्व वस्तू तब्बल 3,000 वर्षांपासून तशाच अबाधित स्थितीत तिथे ठेवलेल्या होत्या. त्या दृश्याचं वर्णन करताना कार्टर म्हणाला होता “मी पाहिलं आणि मी थक्क झालो… समोर फक्त सोन्याचं राज्य होतं.”

तुतनखामेनची ममी

या थडग्याचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे तुतनखामेनची ममी. ती एका तीन स्तरांमध्ये ठेवलेल्या शवपेटीत होती, आणि आतल्या तिसऱ्या पेटीत शुद्ध सोन्यापासून बनवलेली त्याची शवपेटी होती. त्या ममीचा मुखवटा सोन्याने बनवलेला, अत्यंत सुबक आणि प्रभावी. आजही हा मुखवटा कैरोच्या संग्रहालयात ठेवलेला आहे आणि पाहणाऱ्याला प्राचीन काळाच्या भव्यतेची साक्ष देतो.

 

या खोलीतून सापडलेल्या वस्तूंची नोंद ठेवायला कार्टर आणि त्याच्या टीमला तब्बल 10 वर्षे लागली. एकेका वस्तूचा इतिहास, वापर, तिचं महत्त्व समजून घेऊन नोंदवणं हे केवळ कठीण कामच नव्हे तर एक जबाबदारीही होती. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ राजा तुतनखामेनचा नव्हे, तर एका अख्ख्या संस्कृतीचा इतिहास लपलेला होता.

तुतनखामेन हा अवघ्या 9 व्या वर्षी इजिप्तचा राजा झाला आणि त्याचं राज्य केवळ 10 वर्षं टिकलं. 18 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला, आणि तोही एक अनाकलनीय रहस्यच राहिलं. पण त्याचं थडगं, त्यातील खजिना आणि त्यातून मिळालेली माहिती आजही जगभरातील इतिहासप्रेमींसाठी एक जिवंत स्मृती आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!