दगडातही जर एखादे सुंदर शिल्प तयार होत असेल, तर त्यामागे असतात एका कलाकाराचे हात. हीच भावना होती हेन्री रॉयस यांच्या मनात, जेव्हा त्यांनी एका बिघडलेल्या गाडीच्या तुटक्या भागांपासून जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि लक्झरी कारच्या निर्मितीची सुरुवात केली. रोल्स-रॉयस या नावामागे केवळ इंजिनिअरिंग नाही, तर एक दृष्टी, चिकाटी आणि दर्जाच्या सर्वोच्च प्रतीकाची कथा आहे आणि ती सुरू होते 1904 मध्ये, एका साध्यासुध्या पण महत्त्वाच्या प्रसंगापासून.

कोण होते हेन्री रॉयस?
हेन्री रॉयस हे त्या काळात एक अत्यंत कुशल इंजिनिअर होते. त्यांच्याकडे एक फ्रेंच बनावटीची ‘डेकाव्हिल’ कार होती. पण ती गाडी जशी नावाला उठली होती, तशी चालण्यात मात्र त्रासदायक ठरत होती. इंजिन आवाज करत असे, गाडी डळमळीत वाटे आणि तिची बनावटही फारशी टिकाऊ नव्हती. रॉयससारख्या परिपूर्णतेला महत्त्व देणाऱ्या माणसाला हे खपलं नाही. त्यांनी ती गाडी नुसती दुरुस्त न करता, तिचं संपूर्ण पुनर्रचित रूप तयार करायचं ठरवलं आणि इथूनच सुरू झाली रोल्स-रॉयसची कहाणी.
रॉयसने एक नाही, तर तीन प्रोटोटाइप तयार केले. प्रत्येकात काहीतरी वेगळं सुधारलं. इंजिन, ट्रान्समिशन, रेडिएटर, गाडीचं वजन, सस्पेन्शन. परिणामी तयार झाली एक अशी कार, जी डेकाव्हिलपेक्षा कितीतरी पटींनी शांत, स्थिर आणि विश्वासार्ह होती. आणि ही कार पाहायला आले होते लंडनमधील एक महत्वाकांक्षी उद्योजक चार्ल्स रोल्स. 4 मे 1904 रोजी जेव्हा रोल्सने ही कार स्वतः चालवून पाहिली, तेव्हा त्याला कळून चुकलं की ही फक्त एक गाडी नाही, तर भविष्यातील क्रांती आहे. दोघांनी हात मिळवला आणि ‘रोल्स-रॉयस’ या ब्रँडला जन्म मिळाला.
पहिली 10 हॉर्सपॉवरची कार
डिसेंबर 1904 मध्ये, रोल्स-रॉयसने पहिली अधिकृत 10 हॉर्सपॉवरची कार सादर केली. ती मँचेस्टरमधील ‘रॉयस लिमिटेड’च्या कार्यशाळेत तयार झाली. £395 मध्ये विकली गेलेली ही कार, त्या काळातही एक मोठी गोष्ट होती. 1800cc इंजिन, नंतर 1995cc पर्यंत वाढवले गेले, आणि त्यातून 12hp निर्माण होत असे. याशिवाय तिचा 75-इंच व्हीलबेस, त्रिकोणी रेडिएटर आणि मजबूत लीफ स्प्रिंग सस्पेन्शन ह्यामुळे ती त्या काळात तांत्रिक दृष्ट्या अत्याधुनिक मानली जात होती.
ही कार पॅरिस मोटर शोमध्ये दाखवण्यात आली, जिथे तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिची एकूण 16 युनिट्स तयार झाली, ज्यामुळे ती आजही संग्राहकांसाठी अमूल्य ठरत आहे. 2007 मध्ये या कारपैकी एक, ‘चेसिस 20154’, तब्बल £3.2 मिलियनला म्हणजे जवळपास ₹35 कोटींना लिलावात विकली गेली.
‘सिल्व्हर घोस्ट’
या पहिल्या मॉडेलनंतर रोल्स-रॉयसने मागे वळून पाहिलं नाही. 15, 20, 30 अश्वशक्तीच्या मॉडेल्स तयार झाली आणि शेवटी 1906 मध्ये ‘सिल्व्हर घोस्ट’ या नावाने एक एवढी प्रगत आणि डोळे दिपवणारी गाडी सादर झाली, की तिला ‘जगातील सर्वोत्तम कार’ असंही म्हटलं गेलं.