जगातील वाहतुकीच्या इतिहासात एक असा क्षण होता, जेव्हा माणसाने अंतर पार करण्याची संकल्पना नव्याने मांडली आणि त्या प्रवासाची सुरुवात झाली एका साध्या रेल्वेगाडीतून. ही केवळ धावणारी ट्रेन नव्हती, तर ती होती मानवी कल्पकतेची आणि प्रगतीची सुरुवात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगातील पहिली प्रवासी रेल्वे 1807 मध्ये धावली होती, तीही घोड्यांच्या जोरावर! आणि तीच रेल्वे पुढे अवघ्या जगाच्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलून टाकणारी ठरली.

पहिली ट्रेन कुठे धावली?
ब्रिटनमधील वेल्स या प्रदेशात, स्वान्सी ते मंबल्स या मार्गावर ही ऐतिहासिक रेल्वेगाडी धावली. मूळतः ही रेल्वे 1804 मध्ये केवळ चुनखडी वाहून नेण्यासाठी वापरली जात होती. मात्र लवकरच ही कल्पना पुढे नेण्यात आली आणि 1807 मध्ये तिला प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं. घोड्यांवर चालणाऱ्या ट्रॅमरोडवरून ही गाडी शहरी भागात धावत होती आणि तीच झाली जगातील पहिली शहरी सार्वजनिक प्रवासी रेल्वे. त्या काळात फक्त 2 शिलिंग भाड्यात सामान्य माणसाला रेल्वेचा अनुभव घेता येत होता. ही रेल्वे जरी छोटी वाटली, तरी यामुळे एक असा मार्ग खुला झाला जो पुढे औद्योगिक क्रांतीचा कणा ठरला.
त्यानंतरच्या काळात तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले. 1855 ते 1857 दरम्यान घोड्यांच्या जागी स्टीम इंजिन्स आले आणि त्यामुळेच रेल्वे मार्ग विस्तृत होत गेले. हाच काळ होता, जेव्हा जगभरात रेल्वेची एक वेगळीच लाट उसळली आणि या लोखंडी रस्त्यांवरून संपूर्ण अर्थव्यवस्था बदलू लागली.
भारतात कधी आली रेल्वे?
भारतही यापासून फार मागे नव्हता. 16 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी मुंबई (तेव्हाचं बोरीबंदर) ते ठाणे दरम्यान धावली. हा 34 किमीचा प्रवास होता, जो साहिब, सिंध आणि सुलतान या तीन स्टीम इंजिन्सनी ओढलेली 14 डब्यांची गाडी पूर्ण करत होती. त्या गाडीने निघतानाचा क्षण इतका गौरवशाली होता की 21 तोफांच्या सलामीने तिचं स्वागत करण्यात आलं. तो दिवस फक्त रेल्वेचा नव्हे, तर भारताच्या नव्या प्रवासाचा आरंभ बिंदू ठरला.
त्या दिवसापासून भारताने मागे वळून पाहिलंच नाही. 1880 पर्यंत देशात जवळपास 9,000 किमी लांब रेल्वे मार्ग तयार झाला होता. आणि आजची स्थिती अशी की, भारतीय रेल्वे 1,08,000 किमी पेक्षा जास्त रुळांवरून देशाच्या कोपऱ्याकोपऱ्याला जोडते. ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर ती भारताच्या विकासाची जीवनवाहिनी बनली आहे.
1925 मध्ये जेव्हा मुंबईच्या व्हीटी स्थानकावरून पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कुर्ल्याच्या दिशेने निघाली, तेव्हा रेल्वेने आपली नवी ओळख निर्माण केली. आता हीच रेल्वे अधिक जलद, अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनली आहे.