समोसा…एक शब्द जरी कानावर पडला तरी मन ताजातवाना होतं. चहा समोर ठेवलेला असो वा पावसाची सर येऊन गेली असो, समोशाने त्या क्षणाला खास बनवलं नाही असं होत नाही. पण कधी विचार केलात का की जो समोसा आपल्या घराघरात “देसी” मानला जातो, तो खरंतर आपल्याकडे बाहेरूनच आला आहे? यामागे आहे एक चविष्ट इतिहास, जो अनेकांना माहिती नसतो. भारताच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक चौकात सहज मिळणारा समोसा मुळात देशी नाहीच. त्याचा जन्म फारसी संस्कृतीत झाला, आणि तिथून त्याने भारतात आपल्या हृदयात खास स्थान निर्माण केलं.

बालपण असो की आजचा काळ, समोशाने अनेक पिढ्यांशी आपलं खास नातं जोडलं आहे. शाळेच्या सुट्ट्यांपासून ते ट्रेनमधील नाश्त्यापर्यंत, समोसा आपल्या आठवणींमध्ये कायमच असतो. आणि हे नातं सामान्य लोकांपुरतंच मर्यादित नाही, तर आपल्या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही याची मोहिनी पडलेली आहे. सोनम कपूरने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की तिने एकदाच 40 समोसे खाल्ले होते, तर हृतिक रोशन एकावेळी 12 समोसे सहज संपवतो!
समोसा भारतात कुठून आला?
पण हा समोसा भारतात नेमका कुठून आणि कधी आला? या चविष्ट नाश्त्याचं मूळ इराणमध्ये होतं, जिथे त्याला ‘सांबुसाग’ म्हणत. 11 व्या शतकात अबुल फजल बैहाकी या इतिहासकाराने याचा उल्लेख केला. तेव्हा यामध्ये मांस आणि काजू असायचे, आणि तळण्याऐवजी ते फक्त गरम करून खाल्ले जायचे.
13व्या आणि 14व्या शतकात जेव्हा मध्य आशियातील व्यापारी आणि मुस्लिम आक्रमक भारतात आले, तेव्हा त्यांनी समोसाही इथे आणला. अमीर खुसरो आणि इब्न बतुता यांनी त्यांच्या लेखनात या मसालेदार पदार्थाचं वर्णन केलं. अकबराच्या काळात अबुल फजलने ‘ऐन-ए-अकबरी’ मध्ये समोसाचा समावेश शाही खाण्यात केला होता.
समोसा ‘देसी’ कसा झाला?
मग हा समोसा ‘देसी’ कसा झाला? 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात बटाटे आणले आणि त्याच वेळेस समोसात बटाट्याचा भराव देखील सुरू झाला. त्यानंतर यात आले वाटाणे, मसाले, आणि तळण्याची खास भारतीय शैली! आज आपण जो समोसा खातो तो भारतीय आत्म्याशी इतका घट्ट जोडलेला आहे की तो आपलाच वाटतो.