जगात अशी अनेक शिवमंदिरे आहेत जिथे भक्तगण दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात, परंतु एक मंदिर असंही आहे जे फक्त त्याच्या रचनेमुळेच नव्हे, तर त्यामागच्या कल्पनाशक्ती, तपश्चर्या आणि अपूर्व शिल्पकलेमुळे जगातलं एकमेव ठरलं आहे. महाराष्ट्रातील वेरूळ येथे वसलेलं कैलास मंदिर हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत थेट आश्चर्य आणि मनात भक्तिभाव निर्माण करतं. कारण हे मंदिर इतर कोणत्याही मंदिरासारखं नाही. हे संपूर्ण मंदिर फक्त एका दगडातून कोरलेलं आहे. हो, एका अखंड पर्वतातून वरून खाली कोरत-कोरत साकारलेलं हे मंदिर म्हणजे भारतीय स्थापत्यकलेचा एक चमत्कारच आहे.

वेरूळ लेणीमधील कैलास मंदिर
छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळच्या लेण्या जगभरात प्रसिद्ध आहेत. या लेण्या बौद्ध, जैन आणि हिंदू परंपरांचे मूर्त स्वरूप दर्शवतात. या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारं ठिकाण म्हणजे कैलास मंदिर. पहिल्यांदा हे मंदिर पाहताना वाटतं की ते वेगळ्या दगडांनी बांधलेलं असावं, पण जशी माहिती समजत जाते, तसं आपल्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. कारण इथे कोणतेही दगड जोडले गेलेले नाहीत; अखंड खडकाला वरून खालपर्यंत खोदून हे भव्य मंदिर साकारण्यात आलं आहे.
इतिहास सांगतो की हे मंदिर राष्ट्रकूट राजवंशातील राजा कृष्ण पहिला यांनी 8व्या शतकात बांधले होते. त्यांनी जे काही घडवून आणलं, ते आजही जगभरातील वास्तुविशारद आणि इतिहासकार यांना थक्क करतं. साधारणतः इमारती बांधताना पाया खणून वरती बांधकाम होतं. पण कैलास मंदिर मात्र वरून खालपर्यंत कोरण्यात आलं. एकट्या या मंदिरासाठी सुमारे 200,000 टन दगड हटवण्यात आले, तेही सगळं त्या काळातल्या हाताने चालवायच्या साधनांद्वारे.
रामायण-महाभारताच्या मूर्ती एकाच मंदिरात
या मंदिरातील कोरीव काम पाहिल्यावर तुमचं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीकडे जातं. इथं तुम्हाला रामायण आणि महाभारताच्या कथा शिल्पांच्या रूपात कोरलेल्या दिसतात. अगदी प्रभू रामाचा वनवास, रावणवध, अर्जुनाचा गांडीव घेऊन उभा असलेला युद्धभूमीतील क्षण हे सारे प्रसंग अक्षरशः दगडांमध्ये जिवंत वाटतात. त्यामुळे हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ राहत नाही, तर भारतीय संस्कृतीचं आणि अध्यात्मिकतेचं जिवंत रूप बनून उभं राहतं.
या मंदिराच्या रचनेतून आणि कोरीवकामातून एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की त्या काळात केवळ विज्ञान, तंत्रज्ञान नव्हे, तर श्रद्धा, समर्पण आणि प्रचंड कलात्मकता यांचा संगम किती अफाट होता. एका कठीण बेसाल्ट खडकाला जीव देणं हे फक्त तंत्रज्ञानाने शक्य नव्हतं, तर त्यामागे असावा लागतो तो भक्तिभाव आणि दृष्टिकोन.