कोलकात्याच्या गजबजलेल्या टांगरा भागात, एका छोट्याशा गल्लीत वसलेलं एक मंदिर आहे. पण हे कुठलंही सामान्य मंदिर नाही. येथे घंट्यांचा आवाज तर असतोच, पण त्यासोबत मोमोजच्या वाफेचा सुगंधही दरवळतो. हे आहे ‘चिनी काली मंदिर’, एक असं अनोखं ठिकाण जिथे प्रसाद म्हणून मोमोज, चाउमीन आणि तळलेले तांदूळ अर्पण केले जातात. ऐकून थोडं गोंधळल्यासारखं वाटेल, पण ही गोष्ट अत्यंत खरी आहे.

‘चिनी काली मंदिर’
कोलकात्याच्या चायना टाउनमध्ये वसलेलं हे मंदिर एक सांस्कृतिक चमत्कारच म्हणावा लागेल. एका चिनी कुटुंबाची आस्था आणि विश्वासातून याचा जन्म झाला. साधारण 65 वर्षांपूर्वी, एका चिनी मुलाचा जीव धोक्यात आला होता. वैद्यकीय उपचार थकले, आशा संपली. शेवटी त्याच्या आईवडिलांनी टांगरामधील एका झाडाखाली ठेवलेल्या काळ्या दगडासमोर प्रार्थना केली.
तो दगड काही साधा नव्हता, स्थानिकांच्या मते तो देवी कालीचे प्रतीक होता. आणि मग जे घडलं ते एक चमत्कार मानलं गेलं, तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. या घटनेनंतर, स्थानिक चिनी आणि बंगाली समाजाने मिळून त्या ठिकाणी मंदिर बांधले. आज ते चिनी काली मंदिर म्हणून ओळखले जाते.
अनोखी परंपरा
या मंदिरातील पूजा-पद्धत आणि श्रद्धेचे रंगही तितकेच अनोखे आहेत. पारंपरिक मिठाईऐवजी देवीला चायनीज पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गरमागरम चाउमीन, ताजे मोमोज, चविष्ट चायनीज फ्राईड राईस आणि चटकदार चोपसुई. इतकंच नव्हे, तर देवीच्या चरणी सुगंधी चिनी अगरबत्ती आणि हाताने तयार केलेला कागद जाळण्याची परंपरा पाळली जाते. हे वाईट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी केलं जातं, ही प्रथा चीनमधील पारंपरिक श्रद्धेचा एक भाग आहे.
हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भारतात वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदू शकतात याचा जिवंत पुरावा आहे. इथे हिंदू भक्त देवीच्या पायाशी नम्रतेने डोकं टेकवतात आणि चिनी बांधव त्याच श्रद्धेने प्रार्थना करतात. मंदिराच्या भिंतीवर हिंदू देवी-देवतांची चित्रं आहेत, तर छतावर चिनी ड्रॅगनची सजावट एक अद्वितीय संगम ज्याने दोन्ही संस्कृतींचा आदर आणि प्रेम जपलं आहे.