चंद्रग्रहण हे केवळ आकाशातलं दृश्य नाही, तर आपल्या धार्मिक आणि वैदिक परंपरांशी जोडलेला एक अतिशय संवेदनशील क्षण असतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत पूर्णपणे झाकला जातो, तेव्हा आकाशात निर्माण होणारी शांतता, गूढता आणि त्यामागील ज्योतिषशास्त्रीय महत्त्व अनेकांना मंत्रमुग्ध करतं. यंदा 7 सप्टेंबर 2025 रोजी हे दृश्य पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

चंद्रग्रहण कधी?
या दिवशी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे. हा दिवस आधीपासूनच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो, पण यावर्षी तो अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे कारण या रात्री पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. रात्री 9:58 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 1:26 वाजता संपेल. त्यामुळे संपूर्ण भारतात याचा थेट अनुभव घेता येणार आहे. चंद्र पूर्णतः पृथ्वीच्या सावलीत जाईल आणि त्याचा लालसर रंग झळकताना ‘ब्लड मून’चा अद्वितीय अनुभव मिळेल.
भारतात सूतक काळ लागणार?
या चंद्रग्रहणाचं आणखी एक महत्त्वाचं अंग म्हणजे ‘सुतक काळ’. चंद्रग्रहण भारतात स्पष्टपणे दिसणार असल्यामुळे, धार्मिक परंपरेनुसार सुतक देखील लागू होईल. शास्त्रांनुसार, चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक सुरू होतं. या दरम्यान मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात, देवपूजा आणि धार्मिक विधींना थांबवावं लागतं. खाण्या-पिण्यावरही मर्यादा येतात आणि तुळशीची पाने अन्नामध्ये घालून ते दूषित होण्यापासून वाचवलं जातं.
काय करावे, काय नाही?
या काळात केवळ धार्मिक दृष्टिकोनच नाही, तर मानसिक स्वास्थ्याचाही विचार केला जातो. अनेक ज्योतिषशास्त्रज्ञ सुतक काळात मौन पाळण्याचा, मंत्रजप किंवा ध्यान करण्याचा सल्ला देतात. कारण या वेळात वातावरणात अस्थिर ऊर्जा असते, जी शरीरावर आणि मनावर परिणाम करू शकते. विशेषतः गर्भवती महिलांसाठी हा काळ अधिक काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असते.
चंद्रग्रहणाच्या वेळी अनेक लोक आकाशाकडे डोळे लावून बसतात. कुणी त्यामध्ये निसर्गाची अनोखी रचना पाहतो, तर कुणी त्यातून अध्यात्माचं दर्शन घेतो. प्रत्येक व्यक्तीसाठी या घटनेचा अर्थ वेगळा असतो, पण तिचं आकर्षण मात्र सगळ्यांनाच भुरळ घालणारं असतं.