क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही 2 एप्रिल 2011 चा तो ऐतिहासिक क्षण ताजा आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये महेंद्रसिंग धोनीने जेव्हा नुवान कुलशेखरचा चेंडू सीमारेषेबाहेर फेकला, तेव्हा भारताला 28 वर्षांनी विश्वचषक जिंकून दिला गेला. धोनीचा तो ‘हेलिकॉप्टर शॉट’ केवळ एका मॅचचा निकाल नव्हता, तो संपूर्ण देशासाठी एक भावना, एक स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण होता. आणि त्या क्षणाची साक्षीदार ठरलेली बॅट, पुढे क्रिकेट इतिहासातील सर्वात मौल्यवान आठवण बनली.


धोनीच्या 2011 विश्वचषकातील बॅटची किंमत

धोनीच्या त्या बॅटचे केवळ भावनिकच नव्हे, तर आर्थिक मूल्यही कमालीचे होते. कारण ज्याच्यामुळे भारताने विश्वविजेतेपद मिळवलं, तीच बॅट एका चॅरिटी ऑक्शनमध्ये विकली गेली, तब्बल 72 लाख रुपयांना. ब्रिटनमधील ‘ईस्ट मीडलँड्स चॅरिटी’साठी झालेल्या या लिलावात, त्या बॅटसाठी 1 लाख ब्रिटिश पौंड मोजण्यात आले. त्या वेळेच्या चलन विनिमयानुसार ही रक्कम होती 72 लाख रुपये, पण आजच्या रूपांतरण दरानुसार तिची किंमत 1 कोटीच्या घरात पोहोचते.

या विक्रीनं धोनीच्या बॅटला ‘सर्वात महाग विकलेली क्रिकेट बॅट’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळालं होतं. पण 2021 मध्ये हा विक्रम मोडला गेला, जेव्हा सर डॉन ब्रॅडमनची 1934 च्या अॅशेस मालिकेत वापरलेली बॅट 1,31,750 पौंडांना विकली गेली.

2011 विश्वचषकातील सुवर्ण क्षण
2011 चा अंतिम सामना भारतासाठी सुरुवातीपासूनच खडतर ठरत होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 274 धावा फलकावर लावल्या. भारताची सुरुवात डळमळीत झाली. वीरेंद्र सेहवाग पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि सचिन तेंडुलकरही 18 धावा करून माघारी परतला. संपूर्ण देशाचं मन त्या क्षणी धडधडत होतं. पण त्यानंतर गौतम गंभीरने जबरदस्त खेळी करत 97 धावा फटकावल्या आणि भारताला सामन्यात परत आणलं.

गंभीरच्या साथीला मग धोनी मैदानात उतरला. कॅप्टन म्हणून जबाबदारी घेत तो पुढे सरसावला आणि युवराज सिंगसोबत विजयाकडे वाटचाल केली. शेवटी, त्याच्या बॅटमधून निघालेला तो विजयी षटकार, तो क्षण प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरला गेला.

धोनी केवळ एक महान फलंदाज किंवा यशस्वी कर्णधार नव्हता, तो एक असे व्यक्तिमत्त्व होता ज्याने भारताला क्रिकेटच्या मैदानात एक नवीन ओळख दिली. 2007 चा T20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही आयसीसी ट्रॉफीज धोनीने जिंकून दाखवल्या, आणि क्रिकेट इतिहासात अमरत्व प्राप्त केलं.













