आपण एका अशा युगात जगतोय, जिथे देवावर श्रद्धा आणि धर्माची ओळख दोघेही गोंधळात सापडले आहेत. अनेकांसाठी आस्था अजूनही जगण्याचा आधार आहे, तर काहींसाठी ती केवळ एक सामाजिक परंपरा. मात्र याच वेळी, जगात एक नवी विचारधारा पाय रोवू लागली आहे, नास्तिकता. विज्ञान, विवेक आणि वैयक्तिक विचारस्वातंत्र्यावर आधारित ही चळवळ आता एका मोठ्या जागतिक प्रवाहात बदलत चालली आहे. तुम्हाला वाटत असेल की नास्तिक हे अल्पसंख्य आहेत, पण सध्याची आकडेवारी पाहिली तर चित्र वेगळंच दिसतं.

गेल्या काही दशकांमध्ये, विशेषतः प्रगत देशांमध्ये धर्माशी असलेली नाळ हळूहळू तुटताना दिसते आहे. पूर्वी जिथे धर्म ही ओळख होती, तिथे आता लोक “धर्माशिवाय” राहण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. 2010 मध्ये सुमारे 160 कोटी लोक स्वतःला नास्तिक, अधार्मिक किंवा धर्मापासून स्वतंत्र म्हणवायचे. पण 2020 पर्यंत ही संख्या 190 कोटींवर पोहोचली. म्हणजेच अवघ्या 10 वर्षांत तब्बल 30 कोटी नव्या लोकांनी देवावरील श्रद्धेपासून माघार घेतली आहे.
चीन सर्वात मोठं नास्तिक राष्ट्र
या वाढीमागे सर्वात मोठा वाटा चीनचा आहे. जगभरातल्या नास्तिकांपैकी जवळपास 67% लोक चीनमध्ये आहेत. तेथील सरकार आणि सांस्कृतिक विचारधारा पारंपरिक धर्मांना फारसं स्थान देत नाही. यामुळेच चीन जगातील सर्वात मोठं नास्तिक राष्ट्र मानलं जातं. याशिवाय युरोपातील फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, तसेच अमेरिका, जपान, रशिया, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्येही धर्मापासून फारकत घेणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
विशेष म्हणजे, काही दशकांपूर्वीपर्यंत ख्रिश्चन धर्माची गड मानली जाणारी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनसारखी राष्ट्रं आता नास्तिकतेकडे वळताना दिसत आहेत. ब्रिटनमध्ये सध्या सुमारे 2.71 कोटी लोक नास्तिक आहेत. फ्रान्समध्येही अशीच संख्या आहे. एकेकाळी जिथे 50% पेक्षा जास्त लोक देवावर विश्वास ठेवायचे, तिथे आता 40% पेक्षा जास्त लोक स्वतःला धर्मविहीन किंवा नास्तिक म्हणतात.
भारतातील स्थिती
भारतात काय परिस्थिती आहे, असा प्रश्न उद्भवतो. भारत अजूनही श्रद्धेने भारलेला देश आहे. परंतु येथेही नास्तिक विचार पेरले जात आहेत. 2010 मध्ये जिथे सुमारे 30,000 लोक स्वतःला नास्तिक म्हणत होते, तिथे 2020 पर्यंत ही संख्या 50,000 वर गेली आहे. ही जरी एकूण लोकसंख्येच्या तुलनेत फारशी मोठी संख्या वाटत नसली, तरी तिची वाढ 67% झाली आहे, ही बाब लक्षणीय आहे. विशेष म्हणजे, भारतात बौद्ध धर्माच्या अनुयायांपैकी जवळपास 33% लोक कोणत्याही विशिष्ट देवावर श्रद्धा ठेवत नाहीत.