भारत म्हणजे विविधतेने नटलेली भूमी. भाषा, संस्कृती, निसर्ग आणि कधीकधी अशा काही गोष्टी ज्या ऐकल्या की क्षणभर आपण थबकतो. अशाच एका चमत्काराची ओळख करून देणारा अनुभव म्हणजे मेघालयमधला “लिव्हिंग रूट ब्रिज” म्हणजेच जिवंत मुळांचा पूल. हा पूल ना सिमेंटचा आहे, ना स्टीलचा, तरीही शेकडो वर्षे ताठ उभा आहे आणि त्याची ताकद दिवसेंदिवस वाढत जाते.
“लिव्हिंग रूट ब्रिज”

पूर्वोत्तर भारतातील हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं मेघालय हे राज्य आधीच त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्याहूनही अद्वितीय आहे येथील “लिव्हिंग रूट ब्रिज” ज्याचं नाव ऐकून अनेकांना वाटतं की हे काहीतरी काल्पनिक असावं. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात हा पूल पाहता, तेव्हा समजतं की निसर्ग आणि माणसाच्या सहजीवनातून काय काय घडू शकतं.
हा पूल कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला नाही. तो उगम घेतो एका झाडाच्या मुळांपासून फिकस इलास्टिका या रबराच्या झाडाच्या मुळांपासून. मेघालयमधील खासी आणि जैंतिया जमातींनी पिढ्यानपिढ्या त्यांच्या ज्ञानाचा वापर करत हळूहळू या मुळांना नदीच्या पलीकडे वाढवलं. सुरुवातीला त्या मुळांना बांबूच्या सहाय्याने योग्य दिशेने वळवलं जातं आणि काही वर्षांनंतर या मुळांचा एक पूल तयार होतो पूर्णपणे नैसर्गिक आणि टिकाऊ.
उभारणीसाठी 10 ते 15 वर्षांचा वेळ
या अद्वितीय पुलाच्या उभारणीसाठी 10 ते 15 वर्षांचा वेळ लागतो. पण एकदा का पूल पूर्ण तयार झाला की, तो इतका मजबूत असतो की त्यावरून एकावेळी 50 ते 60 लोक सहज चालू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर पूल जसे कालांतराने जुनाट होतात, तसे हे मुळे उलट वाढत राहतात, जिवंत राहतात त्यामुळे हा पूल दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जातो.
किती असते पुलाचे आयुष्य?
आजकाल आपण सगळीकडे सिमेंट आणि स्टीलच्या बांधकामांवर अवलंबून आहोत. पण या पूलाकडे पाहिलं की जाणवतं निसर्गातल्या साध्या गोष्टीही किती प्रभावी ठरू शकतात, जर आपल्याकडे संयम आणि दूरदृष्टी असेल तर. कुठलेही जड यंत्र, मोठे बांधकाम साहित्य न वापरता तयार झालेला हा पूल म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैलीचं मूर्त रूप आहे.
या जीवंत पूलांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांचं दीर्घायुष्य. जर योग्य देखभाल केली गेली, तर हे पूल तब्बल 200 वर्षांपर्यंत टिकू शकतात. हे खरंच अविश्वसनीय आहे की, ज्या गोष्टी काळाच्या ओघात तुटतात, त्या इथे उलट दिवसेंदिवस बहरत जातात.
युनेस्कोमध्येही झाली नोंद
या अद्भुत चमत्काराची महती युनेस्कोनेही ओळखली आहे. मेघालयमधील लिव्हिंग रूट ब्रिज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट झाला आहे. याचा अर्थ इतकाच हे केवळ मेघालयचं नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचं एक ऐतिहासिक व नैसर्गिक ठेवा आहे.
या पुलांचे अनेक प्रकार आहेत, पण सर्वात प्रसिद्ध आहे चेरापुंजीजवळील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज. म्हणजेच दोन मजल्यांचा पूल! वरचा आणि खालचा दोन्ही स्तरांवर चालता येणार असा दुर्मिळ अनुभव. आणि म्हणूनच जगभरातून पर्यटक, निसर्गप्रेमी आणि अभ्यासक या पुलाकडे आकर्षित होतात.