भगवान शिव हे केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत, त्यांची भक्ती, कथा आणि मंदिरांची वास्तू भारताच्या सीमा ओलांडून इतर देशांमध्येही आपली छाप सोडते. अशीच एक अद्वितीय आणि भावनिक गोष्ट आहे कटसराज शिव मंदिराची, जी भारतात नाही तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. या मंदिराचं स्थान जितकं ऐतिहासिक आहे, तितकंच त्याच्याशी जोडलेलं अध्यात्म आणि करुणा हृदयाला भिडणारं आहे.

कटसराज शिव मंदिर
पाकिस्तानमधील चकवाल जिल्ह्यात वसलेलं हे प्राचीन मंदिर भगवान शिवाच्या अश्रूंनी निर्माण झालेल्या कुंडासाठी विशेष ओळखलं जातं. कटास कुंड असं या पवित्र जलाशयाचं नाव असून, कथा सांगते की जेव्हा देवी सतीने आत्मदहन केलं, तेव्हा शोकात बुडालेल्या भगवान शिवाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याच अश्रूंनी हे सरोवर तयार झालं. आजही हे कुंड तिथल्या शांत परिसरात देवाच्या दुःखाची आठवण करून देतं आणि श्रद्धाळूंना अंतर्मुख करतं.
फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आणि त्यामुळे या मंदिराला मिळणारी भक्तांची वर्दळही कमी झाली. पण आजही कटसराज मंदिर पाकिस्तानातील हिंदूंसाठी एक पवित्र आणि श्रद्धेचं स्थळ आहे. अनेकदा भारतातूनही भाविक कटसराज मंदिरात जाण्यासाठी व्हिसा मिळवतात. त्यासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तालय विशेष सहकार्य करतं. हे मंदिर आता केवळ एक धार्मिक ठिकाण राहिलेलं नाही, तर दोन देशांमधील सांस्कृतिक वारशाचा एक भावनिक पूल बनलं आहे.
पांडवांशी सबंधित कथा
या मंदिराबाबत असंही सांगितलं जातं की पांडवांनी वनवासकाळात काही काळ इथे वास्तव्य केलं होतं. त्यामुळे या जागेचा संदर्भ केवळ पौराणिकच नाही, तर महाभारतातील घटकांशीही जोडलेला आहे. एवढंच नव्हे तर आदि शंकराचार्यांनी इथे येऊन तत्वज्ञान आणि वेदांचा प्रचार केल्याची आख्यायिका देखील आहे. त्यामुळे हे स्थान एकेकाळी हिंदू धर्माच्या शिक्षण आणि अध्यात्मिक चिंतनाचं केंद्र मानलं जात होतं.
कटसराज या नावाची मूळ कथा देखील फार हृदयस्पर्शी आहे. काही म्हणतात की शिवाला जेव्हा दक्षप्रजापतीने उपहास केलं आणि सतीने अपमान सहन न करता आत्मदहन केलं, त्यावेळी राग आणि शोकाने भरलेल्या शिवाने कटुत्व व्यक्त केलं. त्याच ‘कटुत्वा’तून कटास हे नाव निर्माण झालं, जे पुढे जाऊन कटसराज बनलं.