भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अनेक गावं त्यांच्या परंपरा, संस्कृती किंवा ऐतिहासिक कारणांमुळे प्रसिद्ध असतात. पण उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक गाव अशा कारणामुळे चर्चेत आलं आहे, जे ऐकल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. ‘हाथिया’ नावाचं हे गाव तुम्हाला पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय पार करता येत नाही. या गावात पाऊल ठेवायचं असेल, तर आधी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे.

हाथिया हे मथुराच्या बरसाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणारं एक लहानसं गाव आहे, पण त्याची ओळख आता एका अनोख्या आणि थोडीशी धक्कादायक कारणामुळे झाली आहे. गावाच्या वेशीवर थेट एक मोठा फलक लावण्यात आला आहे, ज्यावर लिहिलं आहे , “पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय गावात प्रवेश करू नका, अन्यथा फसवणुकीचे बळी होऊ शकता.” हे वाचल्यावर कुणालाही वाटेल, असं काय विशेष आहे इथे?
‘हाथिया’ गाव
या गावातील अनेक लोकांनी मागील काही वर्षांत देशभरातून येणाऱ्या लोकांना चतुराईने फसवलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हाथिया गावातील लोकांची फसवणुकीची पद्धत इतकी हुशारीने आखलेली असते की शिक्षित आणि सावध लोकही त्यांच्या जाळ्यात अडकतात. सर्वात सामान्य आणि गाजलेली फसवणूक म्हणजे “सोन्याच्या विटा” विकण्याचा डाव. हे लोक खोदकामात सोन्याची वीट सापडल्याचं नाट्य उभं करतात. सुरुवातीला ते खऱ्या सोन्याचा एक छोटासा तुकडा दाखवतात आणि मग मोठ्या रकमेच्या मोबदल्यात पितळी वीट विकतात.
हेच नव्हे, तर फसवणुकीची ही व्याप्ती केवळ मथुरापर्यंत मर्यादित नाही. हाथिया गावातील अनेकजण हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये जाऊन अशाच प्रकारे लोकांना गंडा घालतात. त्यामुळे अनेक वेळा इतर राज्यांच्या पोलिसांनीही या गावात छापे टाकले आहेत. मात्र प्रत्येक वेळी स्थानिक पातळीवर संघर्ष निर्माण होतो, आणि कारवाई कठीण बनते.
गावातील फसवणुकीचे प्रकार
या गावातील फसवणुकीचे प्रकार फारच चातुर्यपूर्ण असतात. केवळ सोन्याच्या नावानेच नाही, तर काही वेळा धार्मिक विश्वास, कौटुंबिक अडचणी, किंवा हृदयद्रावक कहाण्यांचा आधार घेतही हे लोक लोकांच्या भावना भडकवतात. अनेक बळी पडणाऱ्यांना नंतर लक्षात येतं की ते फसवले गेले आहेत, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने गावावर विशेष पाळत ठेवायला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून गावात प्रवेशावर थेट नियंत्रण आणण्यात आलं असून कोणालाही थेट गावात शिरता येत नाही. हा निर्णय एका बाजूला कठोर वाटू शकतो, पण फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या पाहता तो अपरिहार्य बनला आहे.