भारतातील जंगलांचा गंध, पानांतून डोकावणारा सूर्यप्रकाश आणि निसर्गाचे सानिध्य यामध्ये एक वेगळीच जादू आहे. या हिरव्या जंगलांच्या कुशीत काही प्राणी असे आहेत, जे केवळ आपल्या सौंदर्याने नव्हे तर त्यांच्या निरागसतेनेही प्रत्येकाचं मन जिंकतात. हे प्राणी इतके गोंडस असतात की त्यांच्याकडे पाहताना काळजाची एक लहर हलते आणि मनात एखादं गोडसं हसू उमटतं. आज अशाच काही खास जीवांची ओळख करून घेऊया, जे भारताच्या जंगलांना अधिकच मोहक बनवतात.
रेड चायना बेअर

सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयच्या थंड, हिरव्यागार जंगलांमध्ये एक लाजाळू आणि शांत प्राणी दिसतो, रेड चायना बेअर. त्याचं लालसर तपकिरी फर, मोहक चेहरा आणि गुबगुबीत शरीर पाहिलं की तो एक कल्पनाविश्वातील प्राणी वाटावा, पण तो खराखुरा आहे. थोडासा सावध, पण नजरेत अपार निरागसता असलेला हा प्राणी थेट हिमालयातून आपल्याला भेट देतो.
इंडियन जायंट स्क्विरल
दुसरीकडे, पश्चिम घाटामध्ये किंवा सातपुडा पर्वतरांगांमध्ये जर आपण डोळसपणे पाहिलं, तर झाडावरून झेपावणारी एक विलक्षण खार आपल्या नजरेत भरते, इंडियन जायंट स्क्विरल. तिच्या अंगावरचे जांभळसर, सोनेरी आणि तपकिरी रंग एकाचवेळी डोळ्यांत भरतात आणि तिची झुबकेदार शेपटी एखाद्या चित्रात शोभावी अशी भासते. ही खार जंगलातील गूढतेचा एक जिवंत नमुना आहे. विशेष म्हणजे याला मराठीमध्ये “शेकरू” म्हणतात, हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.
पिग्मी हॉग
पण भारतातील सर्वात लहान आणि कमी माहित असलेल्या प्राण्यांपैकी एक आहे, पिग्मी हॉग. केवळ 30 सेंटीमीटर उंच असलेले हे छोटे डुक्कर आसामच्या गवताळ भागात राहतात. त्यांचं अस्तित्वच माणसाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आलं आहे. पण जेव्हा ते दिसतात, तेव्हा त्यांच्या छोट्या डोळ्यांतून आणि घाबरट हालचालींतून एक गोडसं निरागसपण जाणवतं, जे सहज कुणालाही आपलंसं वाटावं.
हिमालयीन मार्मोट
हिमालयाच्या उंच पठारांवर एक वेगळीच खार राहते , हिमालयीन मार्मोट. तिचा गोल चेहरा, गालांवरून झुलणारे मऊ केस आणि उभं राहून आजूबाजूला पाहण्याची सवय पाहिली की तिची मस्ती आणि भाबडेपणा लगेच लक्षात येतो. जणू काही ती मनुष्याच्या जगाकडे कुतूहलाने बघते आहे.
पाम स्क्विरल
आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण बागेत किंवा एखाद्या झाडावरून उड्या मारणाऱ्या खारी पाहतो, तेव्हा त्या बहुतेक वेळा पाम स्क्विरल असतात. त्यांच्या पाठीवर असलेल्या तीन पट्ट्यांमुळे त्या पटकन ओळखू येतात. या खारींचं धाडस, चपळता आणि कुठेही सहज मिसळून जाण्याची कला आपल्या जीवनातल्या गोंडस छोट्या क्षणांची आठवण करून देते.
चितळ
आणि शेवटी येतो चितळाचा कळप. त्यांच्या पांढऱ्या ठिपक्यांनी नटलेल्या लालसर शरीरावर सूर्यकिरण पडले की ते दृश्य अक्षरशः स्वप्नवत वाटतं. त्यांच्या मोठ्या डोळ्यांत एक अशी भावना असते की जणू काही ते आपल्याशी न बोलता संवाद साधत आहेत.
हे सर्व प्राणी केवळ जैवविविधतेचा भाग नाहीत, तर आपल्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या उपस्थितीने जंगल केवळ जिवंत होतं असं नाही, तर ते आपल्या अंतःकरणाला स्पर्श करून जातं. अशा या गोंडस जीवांना पाहूनच कधीकधी असं वाटतं की निसर्गाने त्यांच्यामध्ये स्वतःचं कोमल आणि शांत रूप लपवून ठेवलंय.