स्वतःचं घर घेण्याचा विचार करताय? मग ‘या’ सीझनमध्येच करा खरेदी,मिळतात 3 मोठे फायदे!

Published on -

घर खरेदी करणे ही गोष्ट केवळ मालमत्ता मिळवण्यापुरती मर्यादित नसते, तर ती एक स्वप्नपूर्ती, भावनिक गुंतवणूक आणि दीर्घकालीन आर्थिक निर्णय असतो. भारतासारख्या देशात, जिथे ‘आपलं घर’ ही भावना प्रत्येकाच्या हृदयाशी निगडीत असते, तिथे कोणत्या वेळी घर विकत घ्यावं, याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावा लागतो. कारण चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय नंतर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकतो.

पावसाळ्यात कळते खरी स्थिती

पावसाळा हा काळ त्या दृष्टीने खूप उपयुक्त मानला जातो. कारण जेव्हा सगळी ठिकाणं पावसाच्या पाण्याने भरतात, तेव्हाच एखाद्या घराची खरी परीक्षा होते. घराच्या भिंतींमध्ये ओलावा येतोय का? छत गळतंय का? गटारांची व्यवस्था नीट आहे का? बिल्डरने केलेले रंगरंगोटीचे आणि जाहिरातींचे गोडवे बाजूला ठेवून खरी प्रतिमा दिसते, ती फक्त या हंगामात. शिवाय, या काळात अनेक बँका आपले गृहकर्जाचे व्याजदर कमी करतात, कारण बाजारात खरेदीदार कमी असतात आणि विक्रेत्यांनाही ग्राहकांची गरज असते. त्यामुळे, कर्ज घेणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असते.

घर घेताना आपण डिझाइन, लोकेशन आणि फिनिशिंगवर लक्ष केंद्रित करतो, पण खरी महत्त्वाची गोष्ट असते गुणवत्ता. कितीही आकर्षक फ्लॅट असला, तरी जर पावसात त्याच्या भिंती गळायला लागल्या, तर त्या सौंदर्याला काही अर्थ उरत नाही. म्हणूनच, पावसाळ्यात मालमत्तेची खरी स्थिती समजते. खिडक्या, दरवाजे, बाथरूममधील निचरा, छतांची बांधणी या सगळ्याचा आढावा घेतला जाऊ शकतो.

तसेच, घराच्या परिसरातील रस्ते, वाहतूक आणि पाणी साचण्याच्या समस्या याही केवळ या हंगामात समजतात. काही वेळा विकसक ‘प्राइम लोकेशन’ च्या नावाखाली अपूर्ण सुविधा देतात. पण पावसाळा हे सगळं उघड करत असतो. अशा वेळी खरेदीदाराला निर्णय घेणं सोपं जातं, जे खरे आहे ते डोळ्यासमोर असतं.

कमी व्याजदर

सध्या गृहकर्जावर व्याजदर 7.50% च्या आसपास आहे आणि आरबीआयच्या धोरणांमुळे आणखी घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर गृहकर्ज घ्यायचं ठरवलं असेल, तर ही योग्य वेळ आहे. शिवाय, रिअल इस्टेट बाजारात नेहमीच एक चक्र असतं कधी तेजी तर कधी स्थैर्य. पावसाळा हा साधारणपणे ‘कमी मागणी’चा काळ असतो, त्यामुळे किमती जास्त वाढलेल्या नसतात. याचा फायदा तुम्हाला घराच्या किमतीत देखील होतो.

रेडी टू मूव्ह फ्लॅट्स की अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट?

घर घेताना ईएमआय हा महत्त्वाचा घटक आहे. तो तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 45% पेक्षा जास्त नसावा. जेणेकरून रोजच्या गरजा आणि इतर बचतींवर परिणाम होणार नाही. यासोबतच, रेडी टू मूव्ह फ्लॅट की अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट हा प्रश्नही येतो. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स थोडे महाग असतात, पण लगेच ताबा मिळतो आणि सर्व सुविधा तयार असतात. अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट्स स्वस्त असले तरी तिथे बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड, वेळेवर डिलिव्हरी आणि कायदेशीर बाबी यांची नीट पडताळणी करणे गरजेचे असते.

घर खरेदी म्हणजे आयुष्यभराची साथ. म्हणूनच, भावनांवर नाही, तर माहितीवर आधारित निर्णय घ्यावा. पावसाळा ही अशा निर्णयासाठी आदर्श वेळ आहे, कारण घराची खरी स्थिती आणि परिसराची वस्तुस्थिती समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!