भोजपुरी चित्रपटसृष्टीने गेल्या काही दशकांत प्रचंड झेप घेतली आहे. एकेकाळी केवळ ग्रामीण भागापुरती मर्यादित वाटणारी ही फिल्म इंडस्ट्री आता संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने पाहिली जाते. या इंडस्ट्रीतील गाणी तर सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात, पण त्याहीपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतात या क्षेत्रातील स्टार्स. जे आता केवळ पडद्यावर नाही, तर संपत्तीच्या बाबतीतही मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना टक्कर देतात. आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही भोजपुरी अभिनेत्यांविषयी, ज्यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे आणि जे यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.

पवन सिंह
या यादीत सर्वात अगोदर नाव आहे पवन सिंह यांचं. ‘लॉलीपॉप लागेलू’ या गाण्याने घराघरात पोहोचलेले पवन आता केवळ अभिनेता नव्हे, तर राजकारणीही आहेत. 2024 मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सुमारे 16.75 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांनी 2022-23 मध्ये 51.58 लाख रुपये कमावले होते. एक चित्रपट करण्यासाठी ते जवळपास 40 ते 50 लाख रुपये घेतात, तर एका गाण्यासाठी त्यांचे मानधन 2 ते 3 लाख रुपये आहे.
सुपरस्टार रवी किशन
त्यानंतर नाव येते सुपरस्टार रवी किशन यांचं. त्यांनी भोजपुरीसोबतच बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ते भाजपचे खासदारही आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांची एकूण मालमत्ता 43.3 कोटी रुपये आहे, जी त्यांना या यादीत सर्वाधिक श्रीमंत ठरवते.
मनोज तिवारी
मनोज तिवारी हे देखील या यादीतील एक महत्त्वाचं नाव. गायक, अभिनेता, युट्यूबवर प्रसिद्ध चेहरा आणि भाजपचे खासदार असलेले मनोज तिवारी यांच्याकडे सुमारे 30 ते 33 कोटी रुपये मालमत्ता आहे. एका चित्रपटासाठी ते 50 ते 55 लाख रुपये मानधन घेतात. त्यांच्या 2022-23 च्या आयकर विवरणानुसार, त्यांचे वार्षिक उत्पन्न 46.25 लाख रुपये होते.
निरहुआ
निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव हे भोजपुरी सिनेमाचं आणखी एक मोठं नाव. 2024 मध्ये त्यांनी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची मालमत्ता सुमारे 9.4 कोटी रुपये आहे. माध्यमांनुसार, त्यांचे एकूण उत्पन्न 10 कोटींपर्यंत पोहोचते आणि ते एका चित्रपटासाठी 40 ते 50 लाख रुपये घेतात.
खेसारी लाल यादव
खेसारी लाल यादव, जे आपल्या नृत्य आणि अभिनयासाठी ओळखले जातात, त्यांच्या नावावर सुमारे 18 ते 20 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ते एका चित्रपटासाठी 50 ते 60 लाख रुपये मानधन घेतात. गाणी, स्टेज शो आणि ब्रँड अँबेसडरशीपमधूनही त्यांचे भरघोस उत्पन्न होते.