जगातली रेल्वे प्रवासाची संकल्पना ही अनेकांसाठी केवळ साधन नाही, तर एक अनुभव आहे आणि अशा अनुभवांना उंचावर नेऊन ठेवणारी एक आश्चर्यकारक जागा म्हणजे टांगुला रेल्वे स्टेशन. हे स्थानक कुठे आहे माहीत आहे का? भारताच्या अगदी शेजारी, चीनमध्ये. आणि या स्थानकाची उंची इतकी आहे की तिथे ट्रेन पकडताना अक्षरशः आकाशाच्या सान्निध्यात आल्यासारखं वाटतं.

टांगुला रेल्वे स्टेशन
रेल्वे ही नेहमीच समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीची वाहक राहिली आहे. कधी मैदानातून तर कधी डोंगरदर्यातून, ती आपल्या प्रवाशांना पोहोचवते. पण टांगुला रेल्वे स्टेशन ही या प्रवासाच्या उत्क्रांतीचं जिवंत उदाहरण ठरते. समुद्रसपाटीपासून तब्बल 16,627 फूट उंचीवर वसलेलं हे जगातील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे. तिबेटमधील हा भाग ‘डांगला रेल्वे स्टेशन’ म्हणूनही ओळखला जातो. चीनच्या किंगघाई-तिबेट रेल्वे मार्गावरील हे स्टेशन केवळ तिबेटला चीनशी जोडणारा दुवा नाही, तर मानवाच्या जिद्दीचं आणि तंत्रज्ञानाचं प्रतीकही आहे.
हे स्थानक एक विशेष गोष्ट घडवून आणतं, इथे कोणताही कर्मचारी नसतो! हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हे संपूर्ण स्टेशन ऑटोमॅटिक सिस्टिमवर चालतं. स्टेशनवर शिपाई नाही, क्लर्क नाही, तिकिट तपासणी करणारा नाही सर्व काही यंत्रांच्या नियंत्रणात. यामुळेच, 2006 मध्ये उघडण्यात आलेलं हे स्टेशन थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेलं.
रेल्वे स्टेशनची वैशिष्ट्ये
स्टेशनवर एकूण 3 ट्रॅक आहेत एक मुख्य प्लॅटफॉर्मसाठी, दुसरा प्रवासी गाड्यांसाठी, आणि तिसरा एक लहान प्लॅटफॉर्मवरून वापरला जातो. या अनोख्या उंचीमुळे तिथे श्वास घ्यायलाही त्रास होतो, आणि त्यामुळे तिथे फारशा गाड्या थांबत नाहीत. सुरुवातीला 2010 पर्यंत येथे एकही ट्रेन थांबत नव्हती, पण आता रोजची एक ट्रेन ही उंची गाठते.
भारतातही उंचीवर रेल्वे स्थानकं आहेत, जसं की दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या घुम स्टेशनचा उल्लेख करावा लागेल. 7,407 फूट उंचीवर वसलेलं हे भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन केवळ उंचीमुळे प्रसिद्ध नाही, तर त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यामुळे आणि शंभर वर्षांहून अधिक जुन्या वारशामुळे ते UNESCO जागतिक वारसा यादीतही समाविष्ट आहे.