जग्वार हे नाव जरी जुनं असलं, तरी त्याचं सामर्थ्य आजही भारतीय आकाशात दिमाखात झेपावतं आहे. 1970 च्या दशकात भारतीय हवाई दलात सामील झालेलं हे लढाऊ विमान, अनेक दशकांच्या सेवेनंतरही आजच्या आधुनिक युद्धशक्तीच्या तुलनेत मागे नाही. कारण, भारताने हे जग्वार फक्त टिकवून ठेवलं नाही, तर त्यात अशा प्रकारे प्रगत अपग्रेड्स घडवून आणले की ते पुन्हा एकदा लढाऊ विमानांच्या शर्यतीत अग्रस्थानी पोहोचलं आहे. 2035 पर्यंत हे विमान भारतीय हवाई दलात कार्यरत राहणार आहे, आणि ते आता पूर्वीपेक्षा अधिक घातक, अधिक अचूक आणि अधिक विश्वासार्ह बनलं आहे.

जग्वार विमाने
भारतीय हवाई दलात पहिल्यांदा या विमानाची एन्ट्री झाली, तेव्हा जग्वार हे लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी प्रसिद्ध होतं. वर्षानुवर्षे ते हवाई दलाच्या अनेक मिशन्सचा कणा राहिलं आहे. आणि आता, त्याच जग्वारला दिलं जातंय नवसंजीवन. केवळ त्याचं वय लक्षात न घेता, त्याच्यातील क्षमतेचा योग्य उपयोग होईल यासाठी. सध्या सुमारे 115 जग्वार विमाने हवाई दलात सक्रिय आहेत, आणि 2035 पर्यंत त्यांची सेवा सुरू ठेवण्याची योजना आहे.
या विमानात आता ‘ड्रेन-3’ अपग्रेडच्या अंतर्गत अत्याधुनिक AESA रडार लावण्यात आलं आहे. शिवाय, लेसर गाईडेड बॉम्ब आणि टेक्स्ट्रॉन CBU-105 सारखी सेन्सर-फ्यूज्ड शस्त्रंही जोडण्यात आली आहेत. या शस्त्रांमुळे जग्वार आता एकाचवेळी 4 ते 6 टार्गेट्सवर अचूक हल्ला करू शकतं, ज्याचा प्रभाव थेट शत्रूच्या छावण्यांवर, हवाई तळांवर किंवा युद्धनौकांवर दिसून येतो.
भारताच्या संरक्षण प्रणालीत डीप पेनिट्रेशन स्ट्राइक एअरक्राफ्ट म्हणून ओळखलं जाणारं हे विमान अम्बाला, जामनगर आणि गोरखपूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहे. हे विमान दहशतवादी गटांवर, किल्ल्यांवर किंवा ठोस सैनिकी संरचनांवर अत्यंत परिणामकारक हल्ले करण्यास सक्षम आहे.
जग्वारचे इंजिन
जग्वारच्या नव्या अवतारात आणखी एक महत्वाची भर म्हणजे त्याचं इंजिन. नवीन F-125N इंजिन त्याला 43.8 किलो न्यूटनचा प्रचंड थ्रस्ट देणार आहे, ज्यामुळे त्याची गती, उड्डाणक्षमता आणि वजन वाहून नेण्याची ताकद अनेक पटींनी वाढेल. याशिवाय, इस्रायल निर्मित EL/M-2052 रडारसुद्धा या विमानात समाविष्ट करण्यात येणार आहे, जे युद्ध परिस्थितीत शत्रूचा वेगाने शोध घेऊन अचूक लक्ष्य भेदण्यात मदत करतं.
जग्वार हे विमान भारताच्या लष्करी इतिहासाचा एक अमूल्य भाग आहे. त्याने अनेक मिशन्समध्ये आपली ताकद सिद्ध केलेली आहे. पण आज, तांत्रिकदृष्ट्या सुधारित झाल्यानंतर, ते पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि आधुनिकतेसह भारताच्या आकाशात गर्जना करत आहे.