सिंह… नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर एक राजेशाही, आत्मविश्वासाने भरलेली आणि धीट अशी प्रतिमा उभी राहते. जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी केवळ त्याच्या रूपासाठीच नव्हे, तर त्याच्या स्वभावगुणांसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. म्हणूनच जगातील अनेक देशांनी त्याला केवळ एक प्राणी न मानता, राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एक-दोन नव्हे तर तब्बल 15 देशांचा राष्ट्रीय प्राणी म्हणून सिंहाला मान मिळालेला आहे.

सिंहाचं वैशिष्ट्य त्याच्या धीट स्वभावात, भारदस्त चालण्यात आणि आपल्या कळपावर असलेल्या जबाबदारीत दिसून येतं. तो केवळ आपली शिकार करत नाही, तर आपल्या कुटुंबाचं संरक्षणही करतो. त्याचं नेतृत्व, त्याची ताकदीने भरलेली गर्जन, आणि त्याचं अभिजात वर्तन पाहून कोणताही माणूस प्रभावित होतो. म्हणूनच संस्कृतमध्ये त्याला “वनराज” म्हणजेच जंगलाचा राजा असं म्हटलं जातं. सिंहाची गर्जना इतकी ताकदवान असते की ती 8 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येते. हीच ती शक्ती आणि आत्मविश्वास ज्यामुळे तो अनेक देशांचा अभिमान बनतो.
भारत
भारतासारख्या देशाने देखील एकेकाळी सिंहालाच राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता दिली होती. जरी आज वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असला, तरी आपल्या राष्ट्रीय चिन्हामध्ये, अशोक स्तंभावर चार सिंहांची प्रतिमा आजही देशाच्या अस्मितेचं प्रतीक आहे. त्यातील तीन सिंह समोरून दिसतात तर एक मागे लपलेला असतो. एकता, शक्ती आणि नेतृत्वाचं हे प्रतीक आजही आपल्या अस्तित्वाचा अभिमान सांगतं.
श्रीलंका
श्रीलंकेसारख्या देशात सिंहाला फक्त राजकीय नव्हे, तर धार्मिकदृष्ट्याही महत्व दिलं जातं. श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजामध्ये सिंह तलवार हातात धरून उभा आहे, जो बौद्ध धर्मातील चार प्रमुख गुणांना करुणा, मैत्री, सहानुभूती आणि नीतिमत्ता दर्शवतो.
इतर 13 देश
सिंह हा ग्रेट ब्रिटन, श्रीलंका, केनिया, सिंगापूर, नेदरलँड्स, डेन्मार्क, नॉर्वे, लक्झेंबर्ग, इथिओपिया, बल्गेरिया, बेल्जियम, अल्बेनिया, मोरोक्को, युगांडा आणि रवांडा या पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे. हे देश सिंहामधून नेतृत्व, ताकद, शौर्य, आणि संयम यांचे प्रतीक बघतात. सिंह हा फक्त त्यांच्या राष्ट्रचिन्हात नाही, तर त्यांच्या संस्कृतीत, इतिहासात आणि मनामनात सामावलेला आहे.
मात्र, याच सिंहाची लोकसंख्या जगभर झपाट्याने कमी होत आहे. ब्रिटनसारख्या देशात जिथे सिंहाला राजेशाहीचे प्रतीक मानले जाते, तिथेच त्याचं अस्तित्व आता काळजीचं कारण ठरत आहे. अतिक्रमण, शिकारी आणि हवामान बदलामुळे जंगलांचा राजा संकटात आहे.