जग एक ठिकाण असंही आहे, जो जगाच्या नेहमीच्या कल्पनांना धक्का देतो. या देशाचं नाव आहे ‘सीलँड’. जगात अशीही एक जागा आहे, जिचं क्षेत्रफळ फक्त दोन टेनिस कोर्ट इतकं आहे, लोकसंख्या फक्त 27 आहे, आणि तरीही तिथं स्वतःचं सरकार, स्वतःचा ध्वज, चलन आणि अगदी राष्ट्रगीतही आहे.

सीलँडचा जन्म एखाद्या काल्पनिक कथेसारखा वाटतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनने जर्मन हवाई हल्ल्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी इंग्लंडच्या सफोक किनाऱ्याजवळ समुद्रात एक किल्ला उभारला. याचं नाव ठेवलं रफ्स टॉवर. युद्ध संपल्यानंतर या ठिकाणाला सरकारने दुर्लक्ष केलं, पण काहींची कल्पनाशक्ती हीच संधी बनते.
सीलँडचा इतिहास
1967 मध्ये पॅडी रॉय बेट्स नावाच्या ब्रिटिश माणसाने या टॉवरवर ताबा घेतला. तो केवळ यावर थांबला नाही त्याने त्याला स्वतंत्र देश घोषित केलं आणि त्याचं नाव ठेवलं ‘प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड’. नंतर त्याने स्वतःला ‘प्रिन्स रॉय’ म्हणायला सुरुवात केली आणि आपल्या पत्नीला ‘प्रिन्सेस जोन’. या थोड्याशा वेडसर वाटणाऱ्या कल्पनेनं आता अर्धशतक ओलांडलं आहे.
आज या ‘देशा’चं नेतृत्व रॉय बेट्स यांचा मुलगा मायकेल बेट्स करत आहे. सीलँडचं स्वतःचं राजघराणं आहे, एक छोटंसं प्रशासन आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे जगात कुठल्याही देशाने त्याला अधिकृत राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही. तरीसुद्धा, सीलँडमध्ये राष्ट्रगीत आहे. त्यांचा ध्वज आहे, चिन्ह आहे, पासपोर्ट आहे, आणि चलनही आहे. त्याला ‘सीलँड डॉलर’ म्हणतात, जरी तो आंतरराष्ट्रीय बाजारात मान्य नसला तरी त्यांच्या दृष्टिकोनातून तो त्यांच्या सार्वभौमतेचं प्रतीक आहे.
सीलँडमधील लोकसंख्या
सीलँडवर वास्तवात फारसे लोक राहत नाहीत. यातील बहुतांश लोक ई-नागरिक आहेत, म्हणजे ऑनलाइन मार्गाने सीलँडचं नागरिकत्व घेणारे. ही कल्पना जरी थोडीशी विक्षिप्त वाटत असली तरी अनेक लोकांना सीलँडचा भाग व्हावं असं मनापासून वाटतं.
सीलँडला पोहोचणंही काही सोपं नाही. ना रस्ता, ना विमानतळ. तेथे जायचं असेल, तर विशेष बोटीतून किंवा हेलिकॉप्टरच्या साह्याने पोहचावं लागतं. इथं एक निगराणी करणारा व्यक्ती नेहमी असतो, जो तिथल्या सुरक्षेपासून व्यवस्थापनापर्यंत सर्व पाहतो.