भारतात पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाला लागणारी ही आग आता थांबण्याचे नावच घेत नाहीये. अनेक घरांमध्ये महिन्याच्या बजेटमध्ये इंधनखर्चाचा मोठा वाटा जातो आणि त्यामुळे इतर गरजा भागवताना ओढाताण होते. मात्र, भारतात एक असं ठिकाण आहे जिथे पेट्रोल सर्वात स्वस्त मिळतं. येथील इंधन दर ऐकून अगोदर विश्वासच बसणार नाही, मात्र हे सत्य आहे.

अंदमान आणि निकोबार बेटे
असं ठिकाण आहे, अंदमान आणि निकोबार बेटे. हे बेटसमूह भारताच्या पूर्व किनारपट्टीपासून दूर, बंगालच्या उपसागरात वसलेले आहेत. समुद्राने वेढलेले हे निसर्गरम्य बेटे पर्यटनासाठी ओळखली जातात. पण त्याहून जास्त लक्ष वेधून घेतंय इथले पेट्रोलचे दर. कारण संपूर्ण भारतात सर्वात कमी दराने पेट्रोल आणि डिझेल इथे विकलं जातं.
सध्या अंदमान आणि निकोबारमध्ये पेट्रोलचे दर आहे अवघे 82.46 रुपये प्रति लिटर, तर डिझेल फक्त 78.01 रुपये लिटरला मिळतं. ही किंमत देशातील कोणत्याही इतर राज्यापेक्षा नक्कीच खूपच कमी आहे. देशातील बहुतांश भागांमध्ये पेट्रोलचे दर 90 ते 110 रुपयांच्या दरम्यान आहेत. उदाहरणार्थ, राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपयांवर आहे, तर आंध्र प्रदेशात हा दर 110 रुपयांवर पोहोचला आहे. अशात अंदमानचा आकडा खूपच दिलासा देणारा वाटतो.
या बेटांमध्ये पेट्रोल एवढं स्वस्त का
पण या बेटांमध्ये पेट्रोल एवढं स्वस्त का आहे? यामागचं कारण म्हणजे तिथल्या केंद्रशासित प्रशासनाच्या धोरणांतून मिळणारी सूट. केंद्र सरकार या बेटांसाठी वाहतुकीसाठी लागणाऱ्या खर्चाचा भार स्वतः उचलते आणि त्यामुळे इंधनाचा दर नियंत्रणात राहतो. याशिवाय स्थानिक कर आणि इतर अधिभार देखील तुलनेत खूपच कमी असतात.
जर आपण जागतिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर व्हेनेझुएला हा देश जगात सर्वात स्वस्त पेट्रोल विकतो. तिथं एका लिटर पेट्रोलची किंमत फक्त $0.035 म्हणजे सुमारे ₹3.02 आहे. होय, एका लिटर पाण्यापेक्षा देखील स्वस्त, पण त्यामागेही त्या देशातील सरकारचे वेगळे धोरण, तेलसंपत्ती आणि आर्थिक परिस्थिती जबाबदार आहे.
भारत सरकार देखील इंधन दर कमी करण्यासाठी विविध पर्याय शोधत आहे. त्यामध्ये इथेनॉल मिश्रणासारख्या उपाययोजना सुरू आहेत, ज्यामुळे पेट्रोलवरचा अवलंब काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठ्याची अस्थिरता यामुळे इंधन दर कायमच वाढलेले दिसून येतात.