केरळमधल्या तिरुअनंतपुरम शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं एक मंदिर आहे, जे केवळ श्रद्धेचं नव्हे तर संपत्तीचंही प्रतीक मानलं जातं. श्री पद्मनाभस्वामी मंदिर, नाव जरी घेतलं तरी मनात एक गूढ भावना निर्माण होते. या मंदिराशी जोडलेले इतिहास, परंपरा आणि गुप्त तिजोऱ्यांच्या कहाण्या आजही देशभरातील लाखो भक्तांना आकर्षित करतात. इथे येणाऱ्याला केवळ अध्यात्मिक समाधानच मिळत नाही, तर इथली भव्यता पाहून त्यांची नजर थक्क होऊन जाते.

श्री पद्मनाभस्वामी मंदिर
हे मंदिर भगवान विष्णूच्या पद्मनाभस्वामी रूपाला समर्पित आहे. एक भव्य मूर्ती ज्यामध्ये ते शेषनागावर विश्रांती घेताना दाखवले आहेत, त्यांच्यासमोर भक्त आपली प्रार्थना अर्पण करतात. दररोज हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात. मात्र या मंदिरात केवळ श्रद्धेचा महिमा नाही, तर इतकी संपत्ती लपलेली आहे की ती ऐकून कुणाचाही विश्वास बसणार नाही. दरवर्षी सुमारे ₹500 कोटींपर्यंतचे दान येथे येते, आणि त्यामध्ये रोख रक्कम, टनभर सोने-चांदी, हिरे आणि अनमोल दागिन्यांचा समावेश असतो.
मंदिराच्या गाभार्याखाली गुप्त तिजोऱ्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे बंद होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही तिजोऱ्या उघडण्यात आल्या आणि त्यातून जे बाहेर आलं, ते इतिहासातलं एक आश्चर्यच ठरलं. सोन्याचे कांडोरे, हीऱ्यांनी मढवलेले मुकुट, सोन्याच्या मूर्ती, चांदीचे भांडे, देवदेवतांचे अलंकार इतकी संपत्ती की तिची मोजदाद करणेही कठीण.
पण त्याहूनही अधिक रहस्यमय आहे ‘तिजोरी B’ जी आजही उघडलेली नाही. असे म्हटले जाते की या तिजोरीला उघडण्याचा प्रयत्न केला गेला, पण धार्मिक भावना आणि भीती यामुळे ती बंदच राहिली. स्थानिक लोकांचा विश्वास आहे की या दारामागे काही दैवी शक्ती आहे आणि ती उघडल्यास भीषण परिणाम घडू शकतो.
मंदिराची एकूण संपत्ती
या मंदिराची एकूण संपत्ती सुमारे ₹1.2 लाख कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. इतकी संपत्ती की त्यातून एखादा छोटा देशही आपली अर्थव्यवस्था चालवू शकेल. ही संपत्ती कुठून आली, याचं उत्तर इतिहासाच्या पानांमध्ये लपलेलं आहे. पद्मनाभस्वामी मंदिर शतकानुशतकांपासून त्रावणकोरच्या राजघराण्याच्या देखरेखीखाली आहे. हे राजघराणं मंदिराच्या परंपरांचं जतन करत आलं आहे, आणि त्याचबरोबर त्याच्या संपत्तीचंही काळजीपूर्वक व्यवस्थापन केलं आहे.