जर तुम्हाला अचानक कळलं की तुमचं आधार कार्ड निष्क्रिय म्हणजेच डिअॅक्टिवेट झालं आहे, तर घाबरू नका. ही परिस्थिती दुरुस्त करता येते आणि तीही अगदी सोप्या प्रक्रियेद्वारे. आधार कार्ड म्हणजे फक्त एक ओळखीचा पुरावा नाही, तर आजच्या काळात अनेक महत्वाच्या सेवा आणि आर्थिक व्यवहारांसाठी एक अनिवार्य कागदपत्र बनलं आहे. त्यामुळे ते चालू स्थितीत ठेवणं खूप आवश्यक आहे.

आधार कार्ड डिअॅक्टिवेट झालं तर?
UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने एक नियम ठरवला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांच्या कालावधीत त्याचा आधार क्रमांक कुठेही वापरलेला नसेल, तर तो क्रमांक निष्क्रिय केला जाऊ शकतो. यात बँक व्यवहार, पॅन कार्ड लिंकिंग, सरकारी योजनांचा लाभ, किंवा कुठल्याही सरकारी सेवा यांचा समावेश होतो. जर यापैकी काहीच वापर झाला नसेल, तर तुमचं कार्ड निष्क्रिय होण्याचा धोका असतो.
कधी कधी निष्क्रियता चुकीमुळेही होते. उदाहरणार्थ, डेटामध्ये चूक, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची चुकीची नोंद, किंवा तांत्रिक कारणं यामुळेही आधार ब्लॉक होऊ शकतो. म्हणूनच, आपण नेहमी खात्री करून घेतलेली बरी की आपलं आधार कार्ड सक्रिय आहे की नाही.
हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला (uidai.gov.in) भेट द्यावी लागते. ‘आधार सेवा’ या पर्यायावर क्लिक करून, तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकावा लागतो. त्यानंतर एक रंगदर्शक संकेत मिळतो. जर हिरवा रंग दिसला तर तुमचं कार्ड सक्रीय आहे, आणि जर लाल रंग दिसला तर ते निष्क्रिय झालंय.
आधार कार्ड पुन्हा अॅक्टिव कसं करणार?
आता प्रश्न असा पडतो, की हे कार्ड पुन्हा सक्रिय कसं करायचं? त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. उदा. नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीचा पुरावा. या सर्व गोष्टी गोळा करून, तुम्हाला प्रादेशिक UIDAI कार्यालयात जायचं आहे. तिथे तुम्ही स्वतः जाऊन किंवा मेलने, पोस्टने विनंती सादर करू शकता. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला बायोमेट्रिक तपासणीसाठी बोलावलं जातं.
या तपासणीमध्ये तुमचे फिंगरप्रिंट्स आणि आयरिस स्कॅन घेतले जातात. तुमच्या तपशीलांची पुन्हा एकदा खातरजमा केली जाते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सरासरी 2 आठवडे लागतात. आणि सुमारे एका महिन्यात, तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे तुमचं कार्ड पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती मिळते.
संपूर्ण प्रक्रियेसाठी ₹50 एवढं शुल्क घेतलं जातं. ही रक्कम भरून आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुन्हा तुमचं आधार कार्ड सुरळीत वापरू शकता.