घरात कधी अचानक वाद वाढतात, पैशाची चणचण भासू लागते, किंवा कायमच उदास वातावरण जाणवतं, तर शक्यता असते की घराच्या उर्जेत काहीतरी अडथळा आहे. अशा वेळी, घरातील नकारात्मकता दूर करून सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तुशास्त्राचा आधार घेणं हे आपल्या संस्कृतीचा एक जुना, परंपरागत मार्ग आहे. हे फक्त अंधश्रद्धा नाही, तर घरात शांतता, शिस्त आणि सकारात्मक वातावरण टिकवण्याचा एक शास्त्रीय दृष्टीकोन आहे.


वास्तुशास्त्रानुसार काही साधे उपाय आहेत जे आपल्या घराच्या उर्जेला दिशा देतात आणि आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धी वाढवू शकतात. यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे घरातील देवघरात स्वच्छ पाण्याने भरलेला एक लोटा ठेवणे. हे पाणी केवळ देवतेच्या सान्निध्यात नसतं, तर ते घराच्या उर्जेला शुद्ध करतं. त्याचबरोबर दररोज एक रुपया देवघरात ठेवून तो अमावस्येच्या दिवशी दान केल्यास, ते धनप्राप्तीचं प्रतीक मानलं जातं. यामागचा अर्थ एवढाच की दररोज थोडं थोडं दान संचित केल्याने अंतःकरणातही समाधान आणि समृद्धीची जाणीव होते.

सकाळची सुरुवात सकारात्मक करा

घरातील सकाळची सुरुवात ही शांततेने व्हावी, असा वास्तुशास्त्राचा आग्रह आहे. सकाळी लवकर अंघोळ करणं ही फक्त स्वच्छतेची सवय नाही, तर मनःशांती आणि नव्या ऊर्जेच्या स्वागताची तयारी असते. त्याचप्रमाणे, घरात सकाळी कोणी भांडणं करणं, मोठ्याने बोलणं, मुलांना रडू देणं हे सर्व नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारं असतं. एक शांत, प्रेमळ आणि संयमित वातावरणच घरात दिर्घकाळ टिकणारी सकारात्मकता आणतं.
भाकरी गायीला खाऊ घाला

भारतीय संस्कृतीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानलं जातं, आणि त्यामुळे अन्नाचा सन्मान करण्याची परंपरा आहे. जेवण शिजवताना पहिली भाकरी गायीला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला देणं, ही केवळ एक धार्मिक कृती नसून, ती दानभावनेची, सहृदयतेची आणि निसर्गाशी सुसंवाद साधणारी क्रिया आहे. या कृतीमुळे केवळ पुण्य नाही तर घरात प्रेम, करुणा आणि समाधानाची भावना वाढीस लागते.
दिवा लावा
संध्याकाळच्या वेळी घरातल्या काही खास जागा जसं की मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि देवघर अंधारात ठेवू नये, असं मानलं जातं. कारण या जागा घरातील उर्जेचं केंद्र असतात. अंधार नकारात्मक शक्तींना आकर्षित करतो, आणि म्हणूनच अशा जागांमध्ये नेहमी दिवा किंवा प्रकाश असावा.

शेवटी, अमावस्येचा दिवस हा आपल्या पूर्वजांच्या स्मृतींचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. त्या दिवशी अन्न किंवा धान्याचे दान करणं म्हणजे केवळ देवतेला नव्हे तर आपल्या मूळाप्रती एक आदरांजली असते. अशी कृती मनाला स्थैर्य देते आणि घरात मानसिक समाधान आणि धनलाभाचे मार्ग खुले करते.













