आपलं आयुष्य सुलभ आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. चांगली सवय लावतो, नीटनेटकी जीवनशैली ठेवतो, सकारात्मक विचार करतो. पण काही वेळा आपण नकळत अशा गोष्टी करतो, ज्या आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकतात. वास्तुशास्त्रासारख्या शास्त्रांनी या बाबतीत आपल्याला सतर्क केलं आहे. त्यात सांगितले गेले आहे की काही गोष्टी दुसऱ्यांकडून उधार घेऊन वापरणं आपल्या आयुष्यात अडथळे, तणाव आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकतं.

वास्तुशास्त्र केवळ घराच्या बांधणीविषयी किंवा दिशांच्या तत्त्वांपुरतं मर्यादित नाही. ते आपल्या दैनंदिन सवयींवरही प्रकाश टाकतं. अगदी छोट्या, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमध्येही एक विशिष्ट ऊर्जा असते, जी त्या वस्तूशी संबंधित व्यक्तीकडून आपल्याकडे येऊ शकते. म्हणूनच काही वस्तू अशा आहेत ज्या आपण कधीच दुसऱ्यांकडून घेऊन वापरू नयेत.
रुमाल
सर्वात पहिले उदाहरण म्हणजे रुमाल. खिशात असणारा रुमाल हा जरी साधा वाटला, तरी तो थेट आपल्या शरीराच्या संपर्कात असतो. दुसऱ्याचा रुमाल वापरणं हे फक्त स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चुकीचं नाही, तर त्यामधून नकारात्मक ऊर्जा आपल्यात येऊ शकते, असं वास्तुशास्त्र मानतं. अशा ऊर्जेमुळे तुमचं मन चिडचिडं होऊ शकतं, नातेसंबंधांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो, आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
अंगठी
दुसरं उदाहरण म्हणजे अंगठी. अनेकदा आपण एखाद्याची अंगठी काही काळासाठी घालतो. कधी मजेत, कधी गरजेपोटी. पण ही सवय तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते. प्रत्येक दागिन्यात त्या व्यक्तीची एक विशिष्ट ऊर्जा साठलेली असते. ती अंगठी घालणाऱ्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि स्थिती यांचा प्रभाव त्यात असतो. त्यामुळे ती अंगठी दुसरं कुणी घालेल, तर त्या ऊर्जेचा प्रभाव त्यांच्या मन:स्थितीवर होऊ शकतो. जो अनेक वेळा नकारात्मक असतो.
घड्याळ
तिसरी बाब म्हणजे घड्याळ. वेळ ही जशी अमूल्य आहे, तशीच ती व्यक्तीसोबत जोडलेली असते. दुसऱ्याचं घड्याळ वापरणं म्हणजे एका अर्थानं त्यांच्या आयुष्याच्या लयीत हस्तक्षेप करणं. त्यामुळे तुमचं स्वतःचं वेळेचं भान बिघडू शकतं. कामांमध्ये खोळंबा येऊ शकतो, नियोजन कोलमडू शकतं, आणि करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
पेन
पेनही असंच एक साधं वाटणारं पण महत्त्वाचं साधन आहे. विशेषतः जेव्हा त्या पेनने तुम्ही अभ्यास करता, विचार मांडता किंवा एखाद्या मोठ्या निर्णयावर स्वाक्षरी करता. त्या पेनचा स्पर्श सरस्वतीच्या कृपेशी जोडलेला मानला जातो. त्यामुळे दुसऱ्याचा पेन वापरणं म्हणजे तुमच्या सर्जनशीलतेच्या ऊर्जेत हस्तक्षेप होऊ शकतो. परीक्षेमध्ये, मुलाखतीत किंवा कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी स्वतःचा पेन वापरणं ही चांगली सवय मानली जाते.