आजच्या डिजिटल युगात आपली ओळख ही अक्षरशः काही कागदांवर टिकलेली असते, आणि त्यात पॅन कार्डचा भाग फारच महत्त्वाचा आहे. आर्थिक व्यवहार, कर्ज, बँकिंग, गुंतवणूक अशा अनेक क्षेत्रांमध्ये पॅन कार्ड वापरले जाते. पण अनेकदा आपण याच पॅन कार्डाकडे बेफिकिरीने पाहतो, त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो, आणि त्यामुळे आपली फसवणूक होण्याचा धोका वाढतो. एक छोटीशी चूक आर्थिक दिवाळखोरीकडे नेऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

PAN कार्डपासून होणाऱ्या फसवणुकी
आज अनेक इन्स्टंट कर्ज देणाऱ्या अॅप्स किंवा वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्या ग्राहकांची फारशी खातरजमा करत नाहीत. त्यांना केवायसीमध्ये काही विशेष पडताळणी लागत नाही, आणि यातूनच फसवणुकीच्या शक्यता वाढतात. अनेक वेळा पॅन कार्डाची छायाप्रत देताना आपण त्या कागदावर तारीख आणि ‘फक्त याच कारणासाठी’ असे लिहायला विसरतो, आणि हीच चूक स्कॅमरसाठी सोन्याची संधी ठरते.
तुमचं पॅन कार्ड चोरी झालं, हरवलं किंवा तुमच्याच नकळत इंटरनेटवरून एखाद्याच्या हाती लागलं तर तो तुमच्या नावावर बनावट कंपनी सुरू करू शकतो, बनावट बँक खाती उघडू शकतो किंवा तुमच्याच नावावर मोठं कर्ज घेऊ शकतो. याचा सर्व भार तुमच्यावर येतो. तुम्ही कधीच ते कर्ज घेतलं नसलंत तरी, कर्जफेडीची जबाबदारी तुमच्यावरच येते. इतकंच नाही, तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो, आणि भविष्यात खरंच कर्ज हवं असलं तरी ते मिळवणं अवघड होतं.
‘या’ चुका टाळा
अशा गुंतागुंतीच्या प्रसंगांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी काही साध्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पॅन कार्ड देताना त्यावर तारीख, कारण, आणि स्वाक्षरी टाका. कोणत्याही सायबर कॅफेमध्ये पॅन कार्डची कॉपी स्कॅन किंवा शेअर करणं टाळा. तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्येही हे तपशील असुरक्षित स्वरूपात साठवून ठेवणं धोकादायक असू शकतं. अनेकदा ऑनलाइन वेबसाईट्सवर नाव, जन्मतारीख, किंवा पॅन क्रमांक भरताना आपण काळजी घेत नाही. हेच स्कॅमर्सच्या हाती लागल्यास, ते त्या आधारे पॅन क्रमांक शोधून तुमच्या नावावर बनावट व्यवहार करू शकतात.
कधी कधी तुमच्या मोबाईलवर ‘पॅन अपडेट’ किंवा ‘पॅन व्हेरिफाय करा’ अशा बनावट लिंक येतात. त्या क्लिक केल्या तर तुमच्या फोनचा रिमोट अॅक्सेस त्यांच्याकडे जातो, आणि मग तुमचं खातं, माहिती, सर्वकाही त्यांच्या ताब्यात जातं. त्यामुळे अशा कोणत्याही लिंक्सवर अजिबात क्लिक करू नका, आणि शक्य असल्यास अशा मेसेजेसचा स्क्रीनशॉट घेऊन तक्रार नोंदवा.
तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलं आहे का, हे तपासणं देखील फार सोपं आहे. तुम्ही https://www.cibil.com/freecibilscore या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा CIBIL स्कोअर आणि कर्जाचा तपशील पाहू शकता. या वेबसाइटवर लॉगिन करताना तुमचा पॅन क्रमांक, नाव, जन्मतारीख इत्यादी भरल्यानंतर, एक ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर, कोणकोणत्या संस्थांनी तुमच्या नावावर कर्ज घेतलं आहे, याची स्पष्ट माहिती स्क्रीनवर दिसते.
जर अशी कुठलीही फसवणूक तुमच्यासोबत झाली असेल, तर ताबडतोब पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा. याशिवाय, https://www.protean-tinpan.com/ या पोर्टलवरून देखील तुम्ही तुमची तक्रार अधिकृतरीत्या नोंदवू शकता.