कर भरणं म्हणजे अनेक लोकांसाठी डोकेदुखी वाटतं. कधी त्यातले तांत्रिक शब्द समजत नाहीत, तर कधी गणित गोंधळात टाकतं. पण खरं सांगायचं झालं, तर जर तुम्हाला कर रचना थोडीशी समजत असेल आणि थोडा वेळ दिला, तर तुम्ही स्वतः तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) अगदी घरबसल्या भरू शकता तेही तासाभराच्या आत. सरकारनेही ही प्रक्रिया आता इतकी सोपी आणि डिजिटल केली आहे की, तुम्हाला सीएकडे जाण्याचीही गरज पडत नाही.

आवश्यक कागदपत्र
यंदा आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वेळ आहे, पण त्याच वेळी ती वापरणंही गरजेचं आहे. सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाची कागदपत्रं तयार ठेवणं आवश्यक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16 (जर तुम्ही नोकरी करत असाल), फॉर्म 26AS (तुमच्या टीडीएसची माहिती देणारा फॉर्म), कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीची प्रमाणपत्रं, जर काही शेअर्स किंवा मालमत्ता विकली असेल तर कॅपिटल गेन स्टेटमेंट ही सर्व कागदपत्रं जवळ असली की, पुढचा प्रवास खूपच सोपा होतो.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य आयटीआर फॉर्म निवडणं. हे उत्पन्नाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. जसं की, नोकरी करणाऱ्यांसाठी ITR-1 योग्य आहे, तर गुंतवणूक किंवा भाडे उत्पन्न असलेल्यांसाठी ITR-2 लागतो. चुकीचा फॉर्म भरल्यास विभाग तुमचा रिटर्न नाकारू शकतो आणि मग पुन्हा सगळं करावं लागतं.
अधिकृत पोर्टल
एकदा तयारी झाली की, https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा. तिथे तुमचा पॅन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा. ‘ई-फाइल’ या मेनूमध्ये जाऊन ‘Income Tax Return’ या पर्यायावर क्लिक करा. योग्य कर निर्धारण वर्ष (2025-26) निवडा आणि तुमच्या फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. तुमच्या फॉर्म 16 मधली माहिती आणि कॅपिटल गेन, डिडक्शन (80C ते 80TTA पर्यंत) हे नीट समजून फॉर्ममध्ये भरा. एकदा सगळी माहिती भरून झाली की, ‘Review and Submit’ वर क्लिक करा.
मात्र हे केवळ पहिलं पाऊल आहे. रिटर्न सबमिट केल्यानंतर त्याचं ई-व्हेरिफिकेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. ई-व्हेरिफिकेशन न केल्यास तुमचा रिटर्न वैध मानला जात नाही. यासाठी तुम्ही आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीचा वापर करून ‘Verify’ करू शकता.