जर तुम्हीही “आता पुरे झाली नोकरी!” असं म्हणत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकॉनॉमी म्हणून उदयास येत आहे, आणि याचं एक प्रमुख कारण म्हणजे सरकारने सुरू केलेल्या त्या योजनांचा मजबूत पाठिंबा, ज्या नवीन उद्योजकांसाठी आधारस्तंभ ठरत आहेत.

आजची तरुण पिढी नोकरीच्या चौकटीत अडकणं टाळत आहे. सॉफ्टवेअर, अॅप्स, इकॉमर्स, हेल्थटेक अशा अनेक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पनांचा विचार करून अनेक जण स्वतःचं स्टार्टअप सुरू करत आहेत. पण एक मोठा प्रश्न नेहमीच उभा राहतो “पैसा कुठून येणार?” याचे उत्तर केंद्र सरकारच्या स्टार्टअपसंबंधित योजनांमध्ये दडलेलं आहे.
‘स्टार्टअप इंडिया’ योजना
सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेचं. 2016 मध्ये सुरू झालेली ही योजना म्हणजे भारतात नवकल्पना आणि नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकारने उभारलेली एक भक्कम पायरी आहे. या अंतर्गत तुम्हाला मान्यता मिळाल्यावर, 10,000 कोटी रुपयांच्या फंडातून गुंतवणूक मिळू शकते.
याशिवाय बौद्धिक संपदेवर कर सवलत, सुलभ रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि इतर आर्थिक मदतीचे फायदे मिळतात. स्टार्टअप सुरू करताना येणाऱ्या अडचणींसाठी ही योजना एक मजबूत पाठिंबा ठरते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
जर तुम्ही लहान व्यावसायिक आहात, ज्यांना थोडं-थोडं करून मोठं व्हायचं आहे, तर प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) तुमच्यासाठी आहे. शिशु, किशोर आणि तरुण या तीन टप्प्यांत विभागलेली ही योजना तुम्हाला 50,000 ते 10 लाखांपर्यंत हमीविना कर्ज देऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून सरकारचा उद्देश म्हणजे छोट्या व्यवसायांना त्यांचे पाय रोवण्यास मदत करणं.
स्टँड अप इंडिया योजना
तुम्ही जर महिला उद्योजिका असाल किंवा अनुसूचित जाती-जमातींचे प्रतिनिधी असाल, तर स्टँड अप इंडिया योजना तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या अंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं आणि विशेषतः उत्पादन, सेवा किंवा ट्रेडिंग स्टार्टअपसाठी ही योजना फारच फायदेशीर आहे.
CGTMSE योजना
एक आणखी महत्त्वाची योजना म्हणजे CGTMSE योजना, क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस. यामध्ये तुम्हाला 2 कोटी रुपयांपर्यंत कोणतीही तारण न देता कर्ज मिळू शकतं. नवउद्योजकांसाठी आत्मविश्वास वाढवणारी ही एक मोठी संधी आहे.