आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. सरकारी योजना असो, बँकिंग व्यवहार असो किंवा कोणताही महत्वाचा अर्ज भरायचा असो आधार शिवाय काहीच पुढे सरकत नाही. मात्र याच आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर जर बंद झाला असेल तर तुमच्यासमोर अनेक अडथळे उभे राहू शकतात. अशा वेळी नवीन मोबाईल नंबर लिंक करणे अत्यंत गरजेचं ठरतं.

आज अनेक कारणांनी लोकांचे मोबाईल नंबर बदलतात. पण आधारशी लिंक केलेला नंबर जर बंद झाला असेल, तर OTP मिळवून आधार पडताळणी पूर्ण करणं अशक्य होतं. मग बँकेतील व्यवहार, पासपोर्टसाठीचे कागदपत्र, सरकारी योजना, किंवा नोकरीसाठीचे अर्ज काहीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच, अनेक लोकांना जुन्या नंबरऐवजी नवीन नंबर आधारशी लिंक करायची गरज भासते.
मोबिल नंबर अपडेट कसा कराल?
पण प्रश्न असा निर्माण होतो की, जर जुना मोबाईल नंबर काम करत नसेल, तर आधारमध्ये नवीन नंबर नोंदवण्यासाठी नक्की काय करावं लागेल? यासाठी अगदी सोपी आणि अधिकृत पद्धत उपलब्ध आहे. सर्वप्रथम, तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रावर भेट द्यावी लागेल. तिथे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे तुमची ओळख पटवून घेतली जाईल. कारण कोणत्याही प्रकारचा बदल मग तो पत्ता असो किंवा मोबाईल नंबर फक्त बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतरच केला जातो.
सेवा केंद्रात गेल्यावर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. त्या फॉर्ममध्ये तुम्ही कोणता नवीन नंबर जोडत आहात, ही माहिती भरावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर आणि ओळख पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या आधारमध्ये नवीन नंबर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारणतः 7 ते 30 दिवस लागतात. यासाठी तुम्हाला 50 रुपयांचे शुल्क आकारले जाईल.
पारदर्शक आणि सुरक्षित पद्धत
या संपूर्ण प्रक्रियेची खासियत म्हणजे, ती खूपच पारदर्शक आणि सुरक्षित आहे. बायोमेट्रिक चेक असल्यामुळे कोणीही दुसऱ्याच्या नावाने नंबर अपडेट करू शकत नाही. त्यामुळे एकदा का नवीन नंबर नोंदवला गेला, की आधारशी संबंधित सर्व व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरू होतात.
म्हणूनच, जर तुमचा जुना मोबाईल नंबर बंद झाला असेल आणि तुम्हाला आधार OTP मिळत नसेल, तर उशीर न करता जवळच्या आधार सेवा केंद्रात भेट द्या. अन्यथा अनेक सेवा अडून राहतात.