चंबळच्या खडतर दऱ्याखोऱ्या नेहमीच दरोडेखोरांच्या आणि त्यांच्या भयावह कथांच्या आठवणीने झाकोळल्या जातात. मात्र या दऱ्यांमध्ये एक असं मंदिर आहे, जे केवळ त्याच्या स्थापत्यासाठी नाही, तर त्याभोवतालच्या गूढ कथांसाठीही ओळखलं जातं. मोरेनाजवळ सिहोनिया गावात वसलेलं हे मंदिर कधीकाळी मानवी हस्तक्षेपाशिवाय रातोरात उभं राहिल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर म्हणजे केवळ एक पुरातन वास्तू नाही, तर अनेक लोककथांचं आणि श्रद्धांचं केंद्र आहे.

काकणमठ मंदिर
सिहोनिया गावापासून अवघ्या 20 किमी अंतरावर उभं असलेलं हे काकणमठ मंदिर तब्बल 1100 वर्षांहून अधिक जुनं आहे. मात्र आजही ते पूर्ण झालेलं नाही. एकमेकांना घट्ट धरलेल्या दगडांच्या साहाय्याने उभारलेली ही वास्तू पाहताना याचं बांधकाम इतक्या काळात का पूर्ण झालं नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. कारण त्या अपूर्णतेमागेही एक अद्भुत आणि थरारक कथा दडलेली आहे.
स्थानीय आख्यायिकेनुसार, या मंदिराचं निर्माण पांडवांच्या काळाशी जोडलेलं आहे. वनवासाच्या काळात पांडवांनी श्रीकृष्णाच्या आदेशावरून हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली होती. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे मंदिर एक धार्मिक प्रायश्चित्त होतं. एक अशी कृती जी त्यांच्या जीवनातील संकटांवर मात करेल. परंतु नंतरही हे बांधकाम अपूर्णच राहिलं.
मंदिराबाबतची सर्वात गूढ कथा
या मंदिराबाबतची सर्वात गूढ आणि लोकांच्या मनात थरार निर्माण करणारी कथा म्हणजे, हे मंदिर माणसांनी नव्हे तर भूतांनी बांधल्याचं सांगितलं जातं. एका रात्रीत अनेक भुते जमली आणि त्यांनी हे मंदिर उभारायला सुरुवात केली. परंतु पहाटेच्या साखरवेळी कोंबड्याच्या आरवण्याबरोबरच त्यांनी आपलं काम अर्धवट सोडलं आणि तेथून नाहीसे झाले. त्यामुळेच हे मंदिर आजतागायत अधुरं आहे, असं म्हटलं जातं.
इतिहास काय सांगतो?
इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काकणमठ मंदिराचं नाव तोमर राजवंशाशी जोडलं जातं. राजा कीर्तीराज यांनी आपल्या राणी कंकणच्या इच्छेने हे मंदिर बांधायला सुरुवात केली होती. त्यांनी येथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठाही केली होती. त्यामुळे हे मंदिर ‘कंकणमठ’ किंवा ‘काकणमठ’ म्हणूनही ओळखलं जातं.
या मंदिराच्या गूढतेचा आणि वैभवाचा एवढा प्रभाव आहे की आता या कथेवर आधारित चित्रपट बनवण्याचं कामही सुरू झालं आहे. नोएडामधील एका फिल्म प्रोडक्शन कंपनीने यावर चित्रपट साकारण्याचं ठरवलं असून, मध्य प्रदेश पर्यटन विभाग त्याला आर्थिक पाठबळ देणार आहे. हे प्रकल्प केवळ मनोरंजनासाठी नाही, तर ऐतिहासिक ठिकाणांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यमही ठरणार आहे.
इतिहासकारांचे म्हणणे आहे की, काकणमठ मंदिराचा विस्तार खजुराहोच्या प्रसिद्ध कंदरिया महादेव मंदिरापेक्षाही मोठा होता. आज मंदिराच्या परिसरात अनेक भग्नावशेष विखुरलेले आहेत, जे त्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात.