अंतराळातून पृथ्वीवर परत येणं ही केवळ एका प्रवासाची समाप्ती नसते, तर तो एका नवीन, गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील टप्प्याचा प्रारंभ असतो. भारताचे सुपुत्र शुभांशू शुक्ला जेव्हा 15 जुलै रोजी आपल्या अवकाश अभियानातून यशस्वीरित्या परतले, तेव्हा देशभरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण होतं. पण या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचं वैज्ञानिक वास्तवही आहे, जे कदाचित आपल्याला थोडं अपरिचित वाटेल, ते म्हणजे त्यांच्या पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना एका आठवड्यासाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणं.

अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की अंतराळ मोहिमेतून यशस्वीपणे परतणाऱ्या व्यक्तीला सामाजिक जगापासून का दूर ठेवले जाते? त्यामागचं कारण अत्यंत सुस्पष्ट आणि वैज्ञानिक आहे. अवकाश हे पृथ्वीच्या वातावरणापेक्षा पूर्णतः वेगळं असतं. जिथे गुरुत्वाकर्षण नाही, हवामान वेगळं असतं आणि शरीराचं कामकाज एका वेगळ्या पद्धतीने चालतं. जेव्हा अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर परततात, तेव्हा त्यांचं शरीर अचानक बदललेल्या परिस्थितीला सहन करू शकत नाही. त्यांनी जवळपास तीन आठवडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) काढले, जिथे ते सातत्याने गुरुत्वविरहित अवस्थेत राहिले. अशा परिस्थितीत, शरीराचे स्नायू कमकुवत होतात, हाडांची घनता कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील घटते.
शुभांशू शुक्लासारख्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर स्वतःच्या पायांवर उभं राहणंसुद्धा कठीण जातं. कारण अंतराळात सतत तरंगण्याची सवय झाल्यामुळे, शरीराचा तोल, चालण्याची सवय आणि हालचालींचा स्वाभाविक ताळमेळ हरवतो. त्यामुळे त्यांना शारीरिक पुनर्वसनासाठी, मानसिक सल्ल्यांसाठी आणि वैद्यकीय परीक्षणांसाठी वेगळं ठेवावं लागतं. या काळात त्यांना चालणं, व्यायाम करणं, श्वासोच्छ्वास आणि हृदयाची गती सुरळीत करणं अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं.
आयसोलेशनमध्ये ठेवण्यामागील कारणे
केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही हा टप्पा अत्यंत नाजूक असतो. अंतराळातून परतल्यावर लगेचच ज्या गर्दीत, प्रकाशात, गोंगाटात किंवा सामाजिक संपर्कात भाग घ्यावा लागतो, तो त्यांच्या शरीर आणि मनावर अनावश्यक ताण निर्माण करू शकतो. याशिवाय, अंतराळात सतत बंद वातावरणात राहिल्यामुळे एखादी जंतूजन्य प्रक्रिया किंवा सूक्ष्मजिवांच्या संपर्कात ते आले असण्याची शक्यता असते. जरी आत्तापर्यंत कुठलाही अवकाशातील जंतू पृथ्वीवर आला नसल्याचं समोर आलं असलं, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वेगळं ठेवणं आवश्यक मानलं जातं.
शुभांशू यांच्यासारख्या अंतराळवीरांची प्रकृती सुरळीत राहावी, त्यांचं मन प्रसन्न असावं आणि शरीर पूर्वस्थितीत येण्यासाठी तयार व्हावं, यासाठी त्यांना 5 ते 7 दिवस स्वतंत्र कक्षात, डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली ठेवण्यात येतं. यामध्ये त्यांच्या शरीरातील रक्तदाब, स्नायूंची ताकद, मेंदूचं कार्य, हृदयाचे ठोके आणि इतर जैविक प्रक्रिया तपासल्या जातात. मगच त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची, मीडियासमोर येण्याची किंवा सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्याची परवानगी दिली जाते.
जगभरातील आयसोलेशन केंद्रे
आज जगभरात यासाठी खास आयसोलेशन केंद्रे बांधली गेली आहेत. अमेरिकेत ह्युस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटर, फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटर, रशियाच्या मॉस्कोमधील स्टार सिटी, युरोपमधील जर्मनीतील एक अत्याधुनिक सुविधा आणि भारतात बेंगळुरूमधील जैव आयसोलेशन सेंटर.