‘माझी लाडकी बहिण’ ही महाराष्ट्र सरकारची एक अशी योजना आहे, जिला सुरुवातीपासूनच सामान्य महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरु केलेल्या या योजनेतून आतापर्यंत लाखो महिलांना थेट आर्थिक मदत मिळाली आहे. परंतु, अलीकडेच अनेक महिलांनी योजनेतून नाव वगळल्याच्या तक्रारी सुरू केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही अशी शंका वाटत असेल की, तुमचं नाव योजनेच्या यादीतून काढून टाकलं गेलंय का, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

ही योजना 17 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाली, ज्यावेळी राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीने सरकार स्थापन केलं होतं. निवडणुकीपूर्वी महिलांसाठी आश्वासित केलेली ही योजना प्रत्यक्षात आणण्यात आली आणि त्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली. सुरुवातीला ही रक्कम 1,500 रुपये असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं, परंतु प्रत्यक्षात सध्या 1,200 रुपये दरमहा दिले जात आहेत. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आतापर्यंत 11 हप्त्यांत एकूण 16,500 रुपये दिले गेले आहेत.
परंतु याचदरम्यान, शासनाकडून योजनेतील पात्रता नियम अधिक काटेकोर करण्यात आले आणि पारदर्शकतेसाठी काही टप्प्यांवर नावांची पडताळणी सुरू झाली. अनेक महिलांचे नाव अचानक यादीतून वगळल्याचं निदर्शनास आलं. हे अचानक घडलं नाही, तर यामागे सरकारने ठोस कारणं दिली आहेत. काही महिला सरकारी नोकरी करत असूनही या योजनेचा लाभ घेत होत्या, तर काही महिलांनी आयकर रिटर्न भरलेला असल्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सशक्त गटात मोडतात. त्यामुळे अशा महिला अपात्र ठरवल्या गेल्या. आतापर्यंत अशा एक हजाराहून अधिक महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहेत.
यादीत नाव ‘असं’ तपासा
जर तुम्हाला तुमचं नाव अजूनही योजनेत आहे की नाही हे तपासायचं असेल, तर तुम्ही थेट https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. तिथे नाव, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता. जर तुमचं नाव अद्याप योजनेच्या यादीत असेल, तर तुम्हाला पुढील हप्ते मिळतील. मात्र, नाव नसल्यास, याचा अर्थ तुम्ही योजनेच्या बाहेर टाकले गेले आहात.
‘इथे’ करा तक्रार
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल, आयकर रिटर्न भरत नसाल, बँक खाते आधारशी लिंक असेल, केवायसी अपडेट असेल आणि सर्व पात्रता निकष पूर्ण करत असूनही तुमचं नाव वगळलं गेलं असेल, तर तुम्हाला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा वेळी तुम्ही जवळच्या लोकसेवा केंद्रात किंवा पंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. योग्य कागदपत्रे सादर केल्यास, प्रशासन तुमची पात्रता पुन्हा तपासेल.
ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आली असून, तिचा लाभ खरंच गरजूंना मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तुम्ही पात्र असाल आणि चुकीने तुमचं नाव वगळलं गेलं असेल, तर तुम्हाला तक्रार देखील करता येते.