भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि आता आंतरराष्ट्रीय ओळखीचा अंतराळवीर बनलेले शुभांशू शुक्ला यांनी अलीकडेच अॅक्सिओम-4 या महत्त्वाकांक्षी मोहिमेतून अवकाशात भारताचा तिरंगा फडकावला. 18 दिवसांचा हा थरारक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रवास केवळ एक वैयक्तिक यश नाही, तर भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. पण या मोहिमेचा खर्च कोट्यवधींचा असला तरी, शुभांशू यांचा वैयक्तिक पगार ऐकून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

अॅक्सिओम-4 मोहीम
या मोहिमेसाठी भारताने सुमारे 548 कोटी रुपये खर्च केले. यात प्रशिक्षण, संशोधन, प्रवास आणि तांत्रिक सेवा यांचा समावेश होता. परंतु एवढ्या मोठ्या बजेटच्या पार्श्वभूमीवरही शुभांशू यांना मोहिमेसाठी कोणतेही अतिरिक्त मानधन दिलं गेलं नाही. कारण हे एक राष्ट्रीय कर्तव्य आणि सन्मान मानून त्यांनी हे धाडस पूर्ण केलं. भारतातील अंतराळवीरांची वेतनश्रेणी फारशी उच्च नाही. इस्रोमध्ये कार्यरत असलेल्या अंतराळवीरांना दरवर्षी सुमारे 12 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. हा पगार त्यांच्या अनुभवानुसार आणि मोहिमेतल्या भूमिकेनुसार ठरतो.
या तुलनेत, नासामधील अंतराळवीरांना दरवर्षी जवळपास ₹56 लाख ते ₹90 लाख रुपये पगार मिळतो. तेथे त्यांना GS-12 ते GS-13 अशा सरकारी वेतनश्रेणींमध्ये सामावून घेतलं जातं. एवढंच नाही तर युरोप आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशांमध्ये ही रक्कम आणखी जास्त आहे. काही रिपोर्ट्सनुसार युरोपियन स्पेस एजन्सी अंतराळवीरांना दरमहा ₹6 लाख ते ₹9 लाखांपर्यंत वेतन देते, तर ब्रिटनमध्ये हे दरवर्षी ₹46 लाख ते ₹99 लाख दरम्यान असू शकते.
या सगळ्या तुलनेनं पाहता, इस्रोच्या अंतराळवीरांना मिळणारं वेतन खूपच कमी वाटतं. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. इथले वैज्ञानिक आणि अंतराळवीर केवळ पैशासाठी काम करत नाहीत. त्यांच्या मनात असते देशसेवेचं एक पवित्र आणि निःस्वार्थ बाळकडू. शुभांशू शुक्ला हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहेत. ते कुठल्याही खासगी मोहिमेचा भाग नसून भारताच्या अंतराळ सफरीच्या एका नव्या पर्वाचे प्रतीक बनले आहेत.
शुभांशू शुक्ला यांची एकूण संपत्ती
शुभांशू शुक्लाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर काही अहवालांनुसार त्यांची संपत्ती सुमारे $5 ते $8 दशलक्ष, म्हणजे जवळपास ₹40 ते ₹64 कोटी रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम त्यांच्या कठोर मेहनतीचं आणि दीर्घकालीन सेवाभावाचं फलित आहे. एका मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलेल्या या अधिकाऱ्याने स्वतःच्या ज्ञानाने, शिस्तीने आणि सेवाभावाने ही संपत्ती कमावली आहे.
शुभांशू यांचा अंतराळप्रवास केवळ वैयक्तिक यश नाही, तर भारताच्या अंतराळ विज्ञानात भारत आता फक्त एक निरीक्षक नसून, एक निर्णायक सहभागी बनल्याचा पुरावाआहे. अॅक्सिओम-4 मोहिमेत भारताचा सहभाग म्हणजे इस्रोच्या वाढत्या महत्त्वाचं प्रतीक आहे. एकेकाळी अवकाश क्षेत्र फक्त प्रगत देशांचं क्षेत्र मानलं जात होतं, पण आज भारत या यशस्वी मोहिमांच्या माध्यमातून जागतिक नकाशावर स्वतःचं ठाम स्थान निर्माण करत आहे.