उन्हाळ्याचे दिवस असोत, पावसाळ्याचा दमटपणा असो किंवा हिवाळ्याच्या दिवसांत अचानक घरात साचलेली ओलसर हवा, आपल्या घरात किंवा कार्यालयात एअर कंडिशनर म्हणजेच एसीचा उपयोग आता फक्त थंडीसाठीच नव्हे, तर हवा स्वच्छ आणि आरामदायी ठेवण्यासाठीही होतो. पण एसीवर असलेला ‘ड्राय मोड’ हा पर्याय खूप जणांच्या नजरेतून सुटतो. नेमकं हे ड्राय मोड असतं तरी काय? तो कधी वापरायचा आणि त्याचा उपयोग खरंच होतो का? चला हे सविस्तर समजून घेऊया.

ड्राय मोड म्हणजे काय?
ड्राय मोड म्हणजे हवा थंड करण्याचा पर्याय नाही, तर तिच्यातील ओलसरपणा कमी करण्याचा मार्ग. तुम्ही पावसाळ्यात अनुभवले असेल तापमान फारसे जास्त नसते, पण हवेत प्रचंड दमटपणा असतो. अंग घामाने चिकटलेलं वाटतं, श्वास घ्यायलाही कधी कधी त्रास होतो. याच काळात ‘ड्राय मोड’ तुमचा खरा मित्र ठरतो. कारण त्याचे मुख्य काम म्हणजे हवेतील आर्द्रता कमी करणे, ती थोडी कोरडी करून तुमच्यासाठी अधिक सुखद वातावरण तयार करणे.
ड्राय मोड काम करताना एसीचा कंप्रेसर कमी वेळेस चालतो आणि पंख्याचा वेगही हलका असतो. त्यामुळे हवा जास्त थंड न होता तिच्यातील ओलावा शोषला जातो. हे अगदी तसंच आहे जसं आपण डिह्युमिडिफायर वापरतो, पण हा पर्याय तुमच्या एसीमध्येच आधीपासून असतो, तेही कोणतंही वेगळं यंत्र न जोडता.
पावसाळा आणि हिवाळ्यासाठी उपयुक्त
पावसाळ्याच्या दिवसांत, विशेषतः जेव्हा तापमान 25 ते 30 अंशांच्या दरम्यान असतं आणि हवेत चिकटपणा असह्य होतो, तेव्हा ड्राय मोड सर्वोत्तम पर्याय ठरतो. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठीही हा मोड खूप उपयोगाचा असतो, जिथे समुद्राच्या ओढ्यामुळे सतत दमट हवामान राहते.
अनेकांना हे माहिती नसेल, पण ड्राय मोड हिवाळ्यातसुद्धा उपयुक्त ठरू शकतो. उदाहरणार्थ, कपडे घरात सुकवले जात असतील, कीचनमधून स्टीम तयार होत असेल किंवा हिटरमुळे घरातल्या हवेचा बॅलन्स बिघडला असेल, तर हा मोड हवेतील अनावश्यक आर्द्रता कमी करून घरात एक सुसह्य वातावरण निर्माण करतो.
वीज वापर होतो कमी
तुम्हाला कदाचित वाटेल की एसी चालू ठेवणं म्हणजे वीजेचा भरमसाठ वापर, पण ड्राय मोड इथेही एक स्मार्ट पर्याय आहे. कारण यात कंप्रेसर सतत चालू राहत नाही आणि पंख्याचाही वेग मर्यादित असतो, त्यामुळे तुलनेने खूपच कमी वीज वापर होतो. महिन्याच्या शेवटी वीज बिल पाहताना याचा फरक तुमच्या लक्षात नक्की येईल.
आरोग्याच्या दृष्टीनेही याचे फायदे लक्षणीय आहेत. ओलसर हवेमुळे घरात बुरशी, धूळ आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. विशेषतः ज्यांना अॅलर्जी, दमा किंवा श्वसनाच्या तक्रारी असतात, त्यांच्यासाठी हा मोड खूप फायदेशीर ठरतो. यामुळे हवा अधिक स्वच्छ राहते आणि आजारांपासून संरक्षण मिळते.