देशात साक्षरतेच्या नावाने आपण नेमकं कुठं चाललो आहोत? शिक्षण क्षेत्रात सरकारकडून मोठमोठ्या घोषणा आणि धोरणं मांडली जातात, परंतु जमिनीवर जे चित्र उमगलं आहे ते चिंताजनक आणि धक्कादायक आहे. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या एका व्यापक सर्वेक्षणातून उघड झालेल्या आकडेवारीने पालक, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेतील सगळ्यांना अंतर्मुख व्हायला लावलं आहे.

राष्ट्रीय पातळीवरील ‘पारख सर्वेक्षण 2024’ डिसेंबर महिन्यात घेण्यात आलं आणि त्यात देशभरातील 781 जिल्ह्यांतील तब्बल 21 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला. यात सरकारी आणि खासगी अशा जवळपास 74,000 शाळांचा समावेश होता. प्राथमिक म्हणजे इयत्ता 3 री, माध्यमिक म्हणजे 6 वी आणि 9 वी इथल्या विद्यार्थ्यांची ज्ञानपातळी चाचपडण्यात आली. आणि जे उघड झालं ते थेट शिक्षण धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे.
इयत्ता 3 रीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता
इयत्ता 3 रीपर्यंत पोहोचलेल्या बहुतांश मुलांना 1 ते 99 पर्यंतचे अंक लिहिता येत नाहीत. सर्वेक्षणात असं दिसून आलं की फक्त 55 टक्के विद्यार्थ्यांना हे साधं काम जमतं. म्हणजे उरलेले जवळपास 45 टक्के विद्यार्थी हे गणितातील प्राथमिक क्षमताही आत्मसात करू शकलेले नाहीत. एवढंच नव्हे तर 2 अंकी बेरीज-वजाबाकी करता येते, असं फक्त 58 टक्के विद्यार्थी म्हणू शकतात. म्हणजेच हे मूलभूत गणितही अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांच्या डोक्याबाहेरचं राहिलं आहे.
इयत्ता सहावी
सहावी इयत्तेच्या बाबतीतही फार वेगळी स्थिती नाही. गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी ही प्राथमिक गणिती कौशल्यं फक्त 53 टक्के विद्यार्थ्यांना समजली आहेत. म्हणजे अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना अजूनही ही मूलभूत प्रक्रिया नीट समजलेली नाही. आणि यातूनच एक खूप मोठा प्रश्न पुढे येतो. आपण जे शिक्षण देतोय, त्याचा प्रत्यक्षात मुलांच्या आकलनावर काय परिणाम होतोय?
पारख सर्वेक्षणानुसार, मुलांना सर्वात कमी गुण गणितात मिळाले, सरासरी केवळ 46 टक्के. याच्या तुलनेत भाषेच्या चाचणीत 57 टक्के गुण मिळाले. यामधून स्पष्ट होते की गणित ही एक अशी बाब आहे जिच्याशी विद्यार्थ्यांना अजूनही जुळवून घेणं अवघड जातंय.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि अनुदानित शाळांची कामगिरीही फारशी समाधानकारक ठरलेली नाही. दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांची गणितातील कामगिरी सगळ्यात खालच्या स्तरावर आहे. भाषेच्या बाबतीत थोडं चांगलं चित्र दिसत असलं, तरी शिक्षणातल्या असंतुलनाची ही एक मोठी खुण आहे.
ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची कामगिरी
गमतीशीर बाब म्हणजे ग्रामीण भागातल्या इयत्ता 3 रीच्या मुलांनी गणितात शहरी विद्यार्थ्यांपेक्षा थोडी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, पुढच्या इयत्तांमध्ये म्हणजे 6 वी आणि 9 वी मध्ये शहरी भागातल्या मुलांनी सर्वच विषयांमध्ये ग्रामीण भागाला मागे टाकलं आहे.